बेडग येथील आंबेडकरी समाजाचा लाँग मार्च सुरूच, चौघांची प्रकृती खालावली, सरकारकडून कोणतीही दखल नाही.

138

कराड (प्रतिनिधी ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बेडग (ता. मिरज) गावातील स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने फसवले त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाने सांगली ते मुंबई लाँग मार्च सुरू केला आहे. घरांना कुलुपे लावून बॅगा भरुन आंबेडकरी समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे. जो पर्यंत गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान बांधली जात नाही तोवर गावात परत येणार नाही असा निर्धार आंबेडकरी समाजाने केला आहे. ह्या लाँग मार्च मधील चौघांची प्रकृती अशक्तपणामुळे खालावल्याने त्यांना कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात (Venutai Chavan Hospital) दाखल करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील (Sangli News) बेडग (ता. मिरज) गावातील आंबेडकरी समाज मुंबईकडे चालत निघाला आहे. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबे या लाँग मार्चमध्ये सहभागी झाली आहेत. 16 जून रोजी बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज, असा संघर्ष सुरू झाला होता. यातूनच आंबेडकरी समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत माणगाव ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. हा लाँग मार्च रविवारी दुपारी कराडमध्ये दाखल झाला. यावेळी अजित कांबळे, तेजस कांबळे आणि अन्य दोन, अशा चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात (Venutai Chavan Hospital) दाखल करण्यात आले.

कराडमध्ये दाखल झालेल्या लाँग मार्चमधील कुटुंबांनी रविवारी रात्री प्रीतिसंगम हॉलमध्ये मुक्काम केला. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर हा लाँग मार्च सातार्‍याकडे मार्गस्थ झाला. या लाँग मार्चमधील कुटुंबांनी सांगली जिल्हा प्रशासनाने गाव सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत निषेध केला. दलित कुटुंबे घरांना कुलुपे लावून चिमुकल्यांना सोबत घेऊन चालत मुंबईकडे निघाले आहेत.

मिरज तालुक्यातील बेडग गावापासून हे कुटुंबे गेल्या काही दिवसांपासून चालत मुंबईकडे निघाली आहेत. प्रमुख शहरांमध्ये रात्रीचा मुक्काम करून दुसर्‍या दिवशी ते पुढे मार्गस्थ होत आहेत. मात्र, सरकार आणि प्रशासनाने या कुटुंबांच्या या लाँग मार्चची अद्याप दखल घेतलेली नाही. गाव सोडून जाण्यास भाग पाडल्याचा आरोप करत सांगली जिल्हा प्रशासनाचा या कुटुंबांनी जाहीर निषेध केला आहे.