बेडगप्रकरणी सुनावणीवर आंबेडकर गटाचा बहिष्कार, चौकशी समितीने १८३ ग्रामस्थांची बाजू घेतली जाणून..

272

बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्यावरून प्रचंड मोठा वाद निर्माण झाला होता. यावर जिल्हा परिषदेतील सहा अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने शुक्रवारी सुनावणी घेतली.

या सुनावणीस आजी-माजी सरपंच, उपसरपंचासह गावातील १८३ ग्रामस्थांनी हजेरी लावून त्यांची बाजू चौकशी समितीसमोर मांडली. त्यामुळे बेडगच्या ग्रामस्थांनी बंद मागे घेऊन व्यवहार सुरळीत चालू ठेवले. पण, या चौकशीवर आंबेडकरी गटाच्या ग्रामस्थांनी बहिष्कार घातला. जिल्हा परिषदेत कोणीच बाजू मांडण्यासाठी आले नव्हते.

बेडग येथील डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ग्रामपंचायतीने पाडली आहे. यावरून गावामध्ये दोन गटात वाद चालू आहे. स्वागत कमान पाडल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, म्हणून आंदोलकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांची समिती गठित केली होती. यामध्ये प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब कामत, कार्यकारी अभियंता भारती बिराजे सहभागी होते.

या चौकशी समितीसमोर १८३ ग्रामस्थांनी त्यांची बाजू मांडली. काहींनी लेखी स्वरुपात आपली बाजू प्रशासनाकडे दिली आहे. प्रशासनाने समाधानकारक बाजू जाणून घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बेडग बंद मागे घेऊन कामकाज सुरळीत चालू ठेवले होते. दरम्यान, या चौकशीवर आंबेडकरी गटाने बहिष्कार घातल्यामुळे कोणीच चौकशीसाठी आले नव्हते.

जिल्हा परिषदेत चौकशी समितीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्थक गटाचे ग्रामस्थ आले नाहीत. म्हणून चौकशी समितीने मंगळवार, १ ऑगस्ट रोजी बेडग येथे भेट देऊन त्यांची बाजू जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस बंदोबस्त, पण शांततेत सुनावणी

बेडगचे दोनशेंवर ग्रामस्थ जिल्हा परिषदेत चाैकशी समितीसमोर हजर झाले होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पण, ग्रामस्थांनी शांततेत सुनावणीला हजर राहून आपली बाजू मांडली. प्रशासनाने बाजू जाणून घेतल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांवर कारवाईची नोटीस बजावली आहे. तसेच गुन्हे दाखल केलेले आहेत. ते मागे घेण्यासाठी बेडगच्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी पंधरा दिवसाची मुदत चौकशी समितीला दिली आहे. तोपर्यंत बंद मागे घेऊन गावातील व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.

www.YuvaPrabhav.Com हे एक स्वतंत्र मराठी वेब न्यूज पोर्टल आहे. आपण दिलेल्या लाईक, शेयर आणि क्लिक वर गुगल कडून प्राप्त झालेल्या निधी वर YuvaPrabhav.Com सुरू आहे. त्यामुळे बातम्या शेयर करा. Google Play Store वरून YuvaPrabhav चे मोबाईल application डाऊनलोड करा. आम्हाला ट्विटर, फेसबुक वर फॉलो करा. WhatsApp News group मध्ये सामील व्हा. ही विनंती. – आपला प्रफुल कांबळे