अग्रलेख | नवी मुंबई व बेडग : आंबेडकरी समाजाच्या एकीची नांदी…

429

अलीकडच्या काळात महाराष्ट्रात दलित अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. संविधान विरोधी, आरक्षण विरोधी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जातीय सलोखा बिघडत चालला आहे. ह्या मंडळींना कायद्याचा धाक उरलाच नाहीय. असे काहीसे चित्र सध्या पुरोगामी महाराष्ट्रात दिसत आहे.

मागच्या महिन्यात अक्षय भालेराव मारला गेला, ह्या महिन्यात दिपक शेजवळ चा खून करण्यात आला. त्यात ह्याच आठवड्यात सांगली जिह्यातील तालुका मिरज येथील बेडग गावातील दलित समाजाच्या 150 कुटुंबांनी गाव सोडल्याची बातमी आली. ऐन पाऊसात हे सर्वजण पोरा बाळा सोबत मुंबईकडे लाँग मार्च घेऊन निघाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची परवानगी घेवून बांधण्यात आलेली कमान गावाच्या सरपंच व इतर सदस्यांनी प्रशासनाला हाताशी धरून पाडली. संतप्त झालेल्या दलित समाजाने आंदोलनाचे अस्त्र वापरले. मात्र थेट पालक मंत्री व खासदाराचा वरदहस्त असल्याने कमान पाडणाऱ्या जातीयवादी मंडळींना अभय मिळत होते. म्हणून ज्या गावाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चालत नाही, ते गावच आम्हाला नको असे म्हणत ह्या सर्व दलित ग्रामस्थांनी गाव सोडले. तीन दिवस हा समाज मुंबईकडे चालत निघाला होता. पालकमंत्री, खासदार भाजपचा. दोघेही तटस्थ होते. ह्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते.

दरम्यान सांगली सह महाराष्ट्रभर आंबेडकरी समाजात असंतोष पसरत होता. मुंबईत तर आंबेडकरी समाजाने बैठक घेवून बेडग गावाच्या दलित समाजा सोबत आंदोलनात उतरण्याची पूर्ण तयारी केली. मिरज – सांगली – इस्लामपूर असा पल्ला पार करत हा लाँग मार्च मुंबईकडे कूच करत होता. आणि तिसऱ्या दिवशी सरकार खडबडून जागे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेडग गावाच्या दलित समाजाच्या शिष्टमंडळ सोबत मंत्रालयात बैठक घेतली. कमान सरकारी खर्चात बांधू, आणि कमान पाडणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्याविरोधात गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले. जातीयवादी सरपंच व इतर यांच्या विरुद्ध अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल देखील करण्यात आले.

बेडग गावातील दलित समाजाने समस्त आंबेडकरी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कुठल्याही दबावापुढे न झुकता त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.स्थानिक पालकमंत्री, खासदार यांचा प्रचंड मोठा दबाव असताना देखील ह्या 150 दलित कुटुंबांनी सत्तेला आव्हान दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून ऐन पावसात अंगार पेटवायला.

मागच्याच आठवड्यात नवी मुंबईतील समस्त आंबेडकरी समाजाने एकत्र येत वादग्रस्त संभाजी भिडे ची सभा उधळली. वादग्रस्त वक्तव्ये करून उच्च वर्णीय आणि दलित समाजात दुहीची बीजे पेरण्याचे काम संभाजी भिडे यांच्याकडून सातत्याने केले जात आहे. भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी असलेल्या संभाजी भिडे यांची सभा बहादुर भीम सैनिकांनी एकत्र येत उधळून लावली.

नवी मुंबई मधील आणि बेडग गावातील सर्व दलित समाजाच्या ह्या एकीला आणि लढावू बाण्याला मानाचा जय भीम. ह्या दोन्ही घटना, आंदोलन आंबेडकरी समाजाच्या एकीची नांदी ठरू दे ही सदिच्छा.

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)

“कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.” – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

www.YuvaPrabhav.Com हे एक स्वतंत्र मराठी वेब न्यूज पोर्टल आहे. आपण दिलेल्या लाईक, शेयर आणि क्लिक वर गुगल कडून प्राप्त झालेल्या निधी वर YuvaPrabhav.Com  सुरू आहे.

👉 बातमी शेयर करा.
👉 Google Play Store वरून  YuvaPrabhav चे मोबाईल application डाऊनलोड करा.
👉 आम्हाला ट्विटर, फेसबुक वर फॉलो करा.
👉 WhatsApp News group मध्ये सामील व्हा.
👉 आम्हाला सहकार्य करण्यासाठी YuvaPrabhav@gmail.Com वर संपर्क साधा.

स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करा. – आपला प्रफुल कांबळे.