अग्रलेख | दलित अत्याचार : पुरोगामी (?) महाराष्ट्राला लागलेला कलंक..

महाराष्ट्राचा यूपी बिहार झाला आहे का? दलित तरुणांना टार्गेट करून त्यांचा खून केला जात आहे.

630

अलीकडेच नुसत्या “कलंक” ह्या शब्दावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आपण बघितले होते. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुपली. सगळ्या मेन स्ट्रिंम मीडियाने मसाला लावून बातम्या चालवल्या. या थिल्लर बातम्यांमुळे महत्वाचे विषय, अन्याय, अत्याचार ह्या बातम्या, घटना दुर्लक्षित होतात. आणि हेच नेमके चाणाक्ष राजकारणी मंडळींना हवे असते.

आजमितीला महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा कोणता कलंक असेल तर तो म्हणजे दलित अत्याचार. ह्या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्र म्हणावे की नको ह्या द्विधा मनःस्थितीत आम्ही आहोत. गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून मागच्या जून महिन्यात नांदेडला अक्षय भालेराव ह्या दलित तरुणाचा निर्दयी खून करण्यात आला. कुठे आहेत सत्ताधारी, विरोधक ? दलित नेते सोडले तर कोणता नेता पीडित कुटुंबाला भेटला?. निदान नांदेडच्या पालकमंत्र्यांनी तरी भेट दिली का? हाकेच्या अंतरावर असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली नाही.

ह्या दुर्दैवी घटनेला एक महिना देखील पूर्ण होत नाही तोवर संभाजी नगर (औरंगाबाद) येथे तरुण दलित कार्यकर्ता दिपक शेजवळचे हत्याकांड घडवून आणले. गरीब कुटुंबातील, चळवळीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ही बाब महाराष्ट्राच्या वैभवशाली पुरोगामी परंपरेला साजशी आहे का? ह्या महाराष्ट्रात काय सुरू आहे. का दिवसाढवळ्या दलित तरुणांचे मुडदे पाडले जात आहेत. कोण आहेत ह्या जातीयवादी गुन्हेगारांच्या पाठीशी.?

महाराष्ट्राचा यूपी बिहार झाला आहे का? दलित तरुणांना टार्गेट करून त्यांचा खून केला जात आहे. ऐन लग्नाच्या वरातीत भोसकून अक्षय भालेराव ला मारले. संभाजी नगरला दिपक शेजवळ चा खून करून त्याचे प्रेत लटकवले. कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत का? पोलिसांची जरब आणि कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न आता आंबेडकरी समाज विचारू लागला आहे.

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. कोणता आमदार, कोणता नेता दलित अत्याचाराचा मुद्दा मांडतोय ? हे आता आंबेडकरी जनतेने बघायचे आहे.? निवडणुकीच्या प्रचारात जय भीमची आरोळी ठोकायची, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करायचा, प्रचारात निळा झेंडा लावायचा. भीम जयंती मिरवणुकीत येवून नाचायचे, आणि आंबेडकरी मतावर डल्ला मारायचा.

आंबेडकरी समाजाने आता जागरूक राहायला पाहिजे. आपली तरुण पोरं हकनाक बळी जात आहेत. आपण आता एकवटले पाहिजे. नुसती वळवळ बंद करून चळवळीच्या माध्यमातून निर्णायक पाऊल उचलणे काळाची गरज आहे. हे आता सर्वच सुजाण आंबेडकरी समाजाने जाणले पाहिजे.

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)

www.YuvaPrabhav.Com हे एक स्वतंत्र मराठी वेब न्यूज पोर्टल आहे. आपण दिलेल्या लाईक, शेयर आणि क्लिक वर गुगल कडून प्राप्त झालेल्या निधी वर YuvaPrabhav.Com सुरू आहे. त्यामुळे बातम्या शेयर करा. आम्हाला ट्विटर, फेसबुक वर फॉलो करा. WhatsApp News group मध्ये सामील व्हा. ही विनंती. – आपला प्रफुल कांबळे.