#अग्रलेख || न्याय सिलेक्टिव्ह झाला आहे का?

458

नमस्कार मित्रांनो, करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत कमालीची वाढ दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने आपली स्वतःची आणि आपल्या सोबत इतरांची देखील काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टंसिंगचे नियम देखील पाळले पाहिजेत. आपण आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घ्यावी. सगळे काही सरकार आणि सरकारी यंत्रणांवर सोडून नामनिराळे होऊ नका. असू देत.

आजचा विषय आहे, ‘न्याय सिलेक्टिव्ह झाला आहे का’? लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय, आणि जनतेला वेगळा न्याय. असे चित्र सध्या तरी सर्वत्र दिसत आहे. मग तो करोना असू द्यात किंवा अजून कोणता विषय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड भलतेच चर्चेत आले आहेत. पूजा चव्हाण च्या आत्महत्यानंतर तब्बल १५ दिवसापासून अज्ञातवासात असणारे मंत्री संजय राठोड मोठे शक्तिप्रदर्शन करत पोहरादेवी येथे अवतरले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. करोनाचे नियम सरसकट पायदळी तुडवल्यानंतर मंत्री महोदयांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयात यवतमाळ जिल्ह्यातील करोना परिस्थतीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली.

या घटनेच्या दोन दिवस अगोदर राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही असे सांगितले होते. याचे कारण कोरोनाची दुसरी लाट येण्याची निर्माण झालेली शक्यता. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. कदाचित मंत्री संजय राठोड अज्ञातवासात असल्याने मुख्यमंत्र्यांचे आवाहन त्यांच्यापर्यंत पोहचले नसावे. असो. सामान्य नागरिकांच्या तोंडावरचा मास्क खाली आला किंवा मास्क घातला नसेल तर दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाते. हे ह्या ठिकाणी सांगणे गरजेचे आहे.

बरे आता येवूयात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर. १७ दिवस झाले तरी एफआयआर नाही. चोकशी नाही केली तरी राष्ट्रीय महिला आयोगाला व पोलीस महासंचालकांना अहवाल सादर. ह्या प्रकरणासंदर्भात १२ ऑडियो क्लिप्स वायरल झाल्या आहेत. त्याची चोकशी नाही. दोन प्रत्यक्षदर्शी असूनदेखील नाममात्र चोकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. असे गंभीर प्रश्न भाजपच्या राज्य महिला उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी उपस्थित केले. चित्रा वाघ यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना शिवचरित्रातील ‘रांझाच्या पाटला’ ला दिलेल्या शिक्षेचा दाखल देत, सुभेदाराची सून आठवा आणि संजय राठोडचा राजीनामा घ्या असे आवाहन केले आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ‘ गृहमंत्री, संजय राठोड प्रकरणावर गप्प का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ह्या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाहीय. राज्यात कुठंही महिला अत्याचारासंदर्भात बातमी आली कि, निलम गोऱ्हे, विद्या चव्हाण यांची आक्रमक भूमिका ह्याच महाराष्ट्राने पहिली आहे. परंतु आज त्यांची कुठेही प्रतिक्रिया दिसून येत नाहीय. ना कोणता सिलेब्रिटी, ना कोणता साहित्यिक, ना कोणत्या महिला कार्यकर्त्या, ह्या विषयावर बोलत आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी आक्रमकतेने पूजा चव्हाण प्रकरण लावून धरले आहे. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी आक्रमक भूमिका त्या मांडत आहेत. दरम्यान त्याच वेळी चित्रा वाघ यांनाच धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्यावर टिका सुरु आहे. विशेष म्हणजे पुणे येथील वानवडी पोलिसांनी चित्रा वाघ यांना दिलेली वागणूक निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभनीय आहे का?

महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाची धग शांत होत नाही तोवर संजय राठोड प्रकरणामुळे महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. भविष्यात संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल का? पूजा चव्हाण प्रकरणात एफआयआर दाखल होऊन संजय राठोड यांची चोकशी होईल का? ह्या प्रकरणातील मृत पूजा चव्हाण ह्या तरुणीला न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न आहेत. परंतु एकंदरीतच निदान ह्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे सिद्द झाले आहे कि “न्याय हा सिलेक्टिव्ह झाला आहे? उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्यात एक आश्वासक नेतृत्व उदयास आले आहे. जनतेमधील ह्या आशावादाला तडा जायला नको एवढेच ह्या निमित्ताने सांगावेसे वाटते…

लेखक : प्रफुल गोरख कांबळे.
Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com
Email : Kampraful@gmail.com
( आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)