देशात महागाईचा भडका; महागाई दरात विक्रमी वाढ ..

321

जूनमध्ये खाद्यपदार्थ महागले आहेत, त्यामुळे किरकोळ महागाईचे दर पुन्हा वाढले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने चांगलीच वैतागली आहे.

खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे किरकोळ महागाईचा दर जूनमध्ये तीन महिन्यांतील उच्चांकी ४.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सरकारने बुधवारी ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाईची आकडेवारी जाहीर केली. किरकोळ महागाई दर मे महिन्यात ४.३१ टक्के होता, जो जून २०२२ मध्ये ७ टक्के होता.

सरकारी आकडेवारीनुसार, जूनमध्ये अन्नपदार्थांच्या महागाईचा दर ४.४९ टक्के होता, जो मे महिन्यात २.९६ टक्के होता. खाद्य उत्पादने सीपीआयच्या वजनाच्या सुमारे अर्धी आहेत. जूनमध्ये किरकोळ महागाई वाढली असली तरी ती रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या सोयीस्कर पातळीपेक्षा कमी आहे.

किरकोळ महागाई दर २ टक्क्यांच्या मार्जिनसह ४ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. रिझर्व्ह बँक किरकोळ महागाईची आकडेवारी विचारात घेऊन द्वैमासिक पतधोरण आढावा घेते.

रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात पतधोरण आढाव्यात रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला होता. त्याचवेळी एप्रिल ते जून या तिमाहीत किरकोळ महागाई दर ४.६ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.