बो​टाला सुई टोचली, जीव किती कळवळतो…

257

बोटाला सुई टोचली

जीव किती कळवळतो,

सुरे,तलवारी खसाखस

भोकसतात

कसं वाटतं असेल ?

 

साधा चटका बसला

माणूस किती घाबरतो,

साले, जिवंत जाळून मारतात

कसं वाटत असेल…?

 

साधा पदर ढळला

तर –

बाई किती शरमते,

साले, नग्न धिंड काढतात रे

कसं वाटतं असेल…?

 

किती यातना, किती अपमान

किती वेदना

कसं सोसत असेल…?

 

आमची हर एक पिढी

त्यांच्या अत्याचारी

बलात्कारात कुथत आली,

परिवर्तनाच्या लढाईवर

प्रतिगाम्याची औलाद

निर्दयीपणे मुतत आली….!

 

किती काळ हे असंच चालायचं

किती काळ हे सारं निमूट झेलायचं…..

 

आता ठरवलंय….

ठेवलेलं हत्यार खोलायचं

माणसातलं जनावर

आरपार सोलायचं….

 

करायची आहेत माणसं

आतून बाहेरून शुद्ध

आणि,

जागवायचाय प्रत्येक मनात

एक बुद्ध..

कवी – नामदेव ढसाळ 

(संकलन : सागर रामभाऊ तायडे )