“मानवी स्वभाव व त्याचा आपल्यावर होणारा परिणाम”

283

तथागत भगवान बुद्धांनी “मानवी स्वभाव व त्याचा आपल्यावर होणारा परिणाम” यावर दिलेला सुंदर संदेश.एकदा गौतम बुद्धांना विचारण्यांत आले की, मानवाचे कल्याण कशात आहे?.यावर तथागतांनी मानवी स्वभावावर मत व्यक्त केले. आपले चित्त हे समोरच्या व्यक्तीने केलेल्या भाषेमुळे विचलित होते. अशा प्रसंगी काय करावे, यावर बुद्धांनी दिलेला संदेश फार लाभदायी आहे.

१) लाभ आणि हानी ही लोकस्वभावाची पहिली जोडी आहे. एखादा व्यक्ती लाभ झाला की आनंदीत होतो व हानी झाली की दु:खी होतो. अशावेळी शांत राहून लोकस्वभावाच्या आहारी जाऊ नये. त्यावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.

२) किर्ती आणि अपकिर्ती ही लोकस्वभावाची दुसरी जोडी आहे. किर्ती होते तेव्हा आपणास आवडते. पण बदनामी मात्र आवडत नाही. आपण सतत किर्तीमान होत राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र अपकिर्ती झाली की लगेच खचून जातो.आपल्या हातून जोपर्यंत चांगले कार्य घडत असते तोपर्यंत लोक मान-सन्मान देतात.परंतु जर का आपल्या हातून एखादी चुक झाली की तेवढ्याच मोठ्या प्रमाणात बदनामी करतात.अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.

३) स्तुती आणि निंदा ही लोकस्वभावाची तिसरी जोडी आहे.थोड्याशा स्तुतीने आपण स्वत:ला फार मोठे समजायला लागतो आणि निंदेने मात्र हिरमुसले होतो. तथागत भगवान बुद्ध हे वर सांगितलेल्या लोकस्वभावाला धैर्याने सामोरे जाणारे महापुरुष होते. शंभर टक्के कोणीही चांगले अथवा वाईट असू शकत नाही.जेथे स्तुती आहे तेथे निंदाही असू शकते. निंदेचा प्रसंग आला असतांना सहनशिलता व संयम कायम ठेवणेच योग्य असते.निंदेमुळे मनस्थिती जर बिघडवून घेतली तर तो तेथेच थांबून जाऊ शकतो.त्यामुळे त्याचे हातून घडणारे कुटुंबाप्रती व समाजाप्रती पुढील चांगल्या कार्याला तेथेच खिळ बसण्याची फार मोठी शक्यता निर्माण होत असते. म्हणून अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.

४) सुख आणि दु:ख ही लोकस्वभावाची चौथी जोडी आहे.आपण रोज जे कर्म करतो ते सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून.इंद्रिय सुखाच्या प्राप्तीसाठी आपण नेहमी धडपडत असतो. संपत्ती, पैसा, पद, सौंदर्य, सत्ता, लग्न, कुटुंब, गाडी, बंगला इत्यादी आपल्या सुखाच्या कल्पना असतात.याची प्राप्ती झाली की जीवनात सर्व सुखे मिळालीत असे वाटते. सर्व भौतिकबाबी सुखाची साधने आहेत.ते साध्य नाहीत.म्हणून सर्व सुख आणि दु:खाच्या प्रसंगात आपले चित्त ढळू न देता आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे.

लेखक : भन्ते शाक्यपुत्र राहुल 

पैठण, महाराष्ट्र. 

संपर्क : 9834050603 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ