अग्रलेख | हेच का ते रामराज्य…? (भाग १)

महिनाभर नरेंद्र मोदी आणि चित्ते मीडियाच्या केंद्रस्थानी होते. सरकार मीडिया फक्त आणि फक्त "चित्ता - पुराण" सांगण्यात व्यस्थ होते. मात्र त्याचवेळी लखिमपुर खिरी येथे दोन अल्पवयीन दलित मुलींचा बलात्कार करून त्यांची हत्या करून एकाच फासावर लटकविण्यात आले होते.

415

( प्रफुल कांबळे) | नमस्कार मंडळी. मागील आठवड्यात शेतकऱ्यांची व्यथा अग्रलेखातून माडण्यात आली होती. ह्या लेखाला वाचकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी ईमेल च्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या. सर्वांचे आभार. आजच्या अग्रलेखाच्या शीर्षकाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या जातील. कारण ही तसेच आहे. २९ सप्टेंबर ह्याच दिवशी खैरलांजी हत्याकांड घडले. जगभरात ह्या प्रकरणाने भारताची नाच्चकी झाली. त्याच घटनेला १६ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. ह्या घटनेने समाजमन पार ढवळून निघाले. भोतमांगे परिवाराला न्याय मिळाला का? याविषयी आपण सर्वजण जाणतोच.

आज सोळा वर्षानंतरही भारतात विविध राज्यात अनेक ठिकाणी खैरलांजी सारख्या घटना घडत आहेत. जातीय अत्त्याचार वाढला आहे. उत्तर भारतात राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी तर जातीयवादाने कळस गाठला आहे. रोज नवनवीन घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत देखील जातीय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. त्यातून ह्या चिमुरड्यांना मारहाण केली जाते. राजस्थानमधील बालक इंदर मेघवालने पिण्याच्या पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून शाळेतील शिक्षकाकडून झालेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. इंदर मेघवाल आणि जितेंद्र मेघवाल यांच्या घटना ताज्या असतानाच राजस्थानातील जालोर जिल्ह्याच्या सायला तालुक्यातील चौराऊ गावात एका दलित युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह गावातील एका झाडावर टांगण्यात आला. राजस्थानातील विविध शाळांमधून जातीयवादाच्या घटना याच काळात समोर आल्या आहेत.

उत्तरप्रदेश विषयी काय बोलायचे. याठिकाणी तर कायदा सुव्यवस्थेचा बाजार उठला आहे. दर दिवसाला येथे दलीत अत्याचाराची बातमी समोर येत आहे. लखिंमपुर खिरी येथील घटनेने तर अत्याचाराची परिसीमा गाठली. दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडावर टांगण्यात आला. याठिकाणी देखील उत्तर प्रदेश पोलिसांची क्रूरता दिसली. पिडीत मुलीच्या पालकांना त्रास देण्यात आला. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वांना हाथरास येथील घटना आठवत असेलच ना.? अजून हाथरस हत्याकांडातील मृत मुलीला २ वर्षानंतरही न्याय मिळाला नाहीय. हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

राजस्थान किंवा उत्तर प्रदेश या ठिकाणी जातीय अत्याचाराने कळस गाठला आहे. दलितांवर अत्याचार होत आहेत. अल्पवयीन मुली, महिलांवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह झाडांना टांगण्यात येत आहे. त्यानंतर उच्चवर्णीय समुदायातील ह्या आरोपींना वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागत आहे. आरोपींच्या समर्थनात पंचायतीचे आयोजन करण्यात येत आहे. पोलिसांमार्फत पिडीत परिवारावर दबाव आणला जात आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि रामराज्य चे स्वप्न दाखवत सत्तेवर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाचे निमीत्त साधून दक्षिण आफ्रिका मधून ८ चित्ते १७ सप्टेंबर रोजी भारतात आणले. मध्यप्रदेशातील कुनो अभयारण्यात त्यांचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यांनतर त्यांनी त्यांच्या मन की बात ह्या कार्यक्रमात, भारतात चित्ते परतल्याने १३० कोटी भारतीय आनंद आणि अभिमानाने भारून गेले आहेत, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मन की बातच्या ह्याच भागात मोदी म्हणाले की, “देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातील लोकांनी चित्ता परत आल्यावर आनंद व्यक्त केला; १.३ कोटी भारतीय आनंदी आणि अभिमानाने भारले आहेत. एक टास्क फोर्स चित्त्यांवर लक्ष ठेवेल, ज्याच्या आधारावर आम्ही ठरवू की तुम्ही हे चित्ते केव्हा पाहू शकाल.” तसंच मोदींनी चित्त्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेसाठीचं नावही सुचवण्यास सांगितलं आहे.

महिनाभर नरेंद्र मोदी आणि चित्ते मीडियाच्या केंद्रस्थानी होते. सरकार मीडिया फक्त आणि फक्त “चित्ता – पुराण” सांगण्यात व्यस्थ होते. मात्र त्याचवेळी लखिमपुर खिरी येथे दोन अल्पवयीन दलित मुलींचा बलात्कार करून त्यांची हत्या करून एकाच फासावर लटकविण्यात आले होते. मीडिया आणि सरकार ह्यांना ह्या वेदनादायक घटना दखल घेण्या योग्य का नाही वाटल्या..?

दलितांचा खून करून झाडावर लटकवण्याचा ट्रेण्ड ह्या भारतात सुरू झाला आहे का? असा प्रश्न ह्या पार्श्वभूमीवर विचारला जात आहे. सरकार, प्रशासन, मीडिया, न्यायव्यवस्था ह्या दमनशाही कडे लक्ष देणार आहे की नाही. रामराज्यात शंबुकाचा बळी दिला होता. तो कोणत्या कारणासाठी दिला होता हे आता सर्वांना चांगलेच ज्ञात आहे. मग आता तुम्हाला हे स्पष्ट करावेच लागेल की तुमच्या हिंदुत्व आणि राम राज्यात दलित समाजाचे स्थान नेमके कोणते…?

(क्रमशः)

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

(kampraful@gmail.com)

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)