शिव जयंती विशेष : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज !!

996
स्वराज्याचे संस्थापक!
स्वातंत्र्ययोद्धे!
कुशलसंघटक!
स्फूर्तीदाते!
युगप्रवर्तक!
कुळवाडीभूषण!
छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती! जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम!!
कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजीचा! लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्याचा! काळ तो असे यवनांचा शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा!! असे तो डौल जहागिरीचा! पंधराशे एकूणपन्नास साल फळले! जुन्नर ते उदयास आले!! शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले! जिजाबाईस रत्न सापडले!!
महात्मा जोतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 1000 ओळींचा पोवाडा लिहिलेला आहे.त्या पोवाड्यातील सुरुवातीच्या काही ओळीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे वर्णन केले आहे. लहानपणापासून मातोश्री जिजाऊनीं शिवाजी महाराजांना दिलेली शिकवण महत्त्वाची होती. ‘परस्त्री मातेसमान’ शत्रुपक्षाच्या स्त्रियांचाही मान राखणारा राजा विरळाच! कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी दिलेली वागणूक म्हणजे अत्यंत प्रशंसनीय बाब होय! स्त्री मग ती शत्रु पक्षाची का असेना तिचा मान सन्मान केलाच पाहिजे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा दंडक होता. मध्ययुगीन काळात स्त्री म्हणजे भोगदासी! त्या काळातील राजेशाही व सरंजामशाही या दोन्ही पद्धतीमुळे स्त्रियांचे जीवन म्हणजे गुलामगिरी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन उदार होता मानवतावादी होता. आज आपण पाहतो की, जाती, धर्म, द्वेषातून महिलांवर मुलीवर होत असलेले अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. पितृसत्ताक मानसिकता लोकांच्या मानगुटीवर बसली आहे. अशा या काळात स्त्रियांना मानवतावादी दृष्टिकोनातून पाहणारे शिवाजीराजे सर्वांसाठीच आदर्श आहेत.
आपल्या राज्यातील स्त्रीयांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. असा शिवाजी महाराजांचा दंडक होता. सती प्रथा शिवाजी महाराजांना मान्य नव्हती.शहाजीराजे यांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती गेल्या नाही. धर्माचे रक्षक म्हणणार्‍यांनी रान उठवले परंतु जिजाऊ सती गेल्या नाही. मध्ययुगात स्त्रियांना गुलाम करण्याची प्रथा होती. शिवाजी महाराजांनी ही प्रथा बंद केली. स्त्रियांच्या मानवी हक्काचे शिवाजी महाराजांनी रक्षण केले. मध्ययुगामध्ये शिवाजी महाराज एकमेव सत्ताधीश असावेत ज्यांनी स्त्रियांना आदराची वागणूक दिली. स्त्रियांना सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी आपल्या सैनिकांना त्यांनी काही ताकीद केल्या होत्या. स्त्रियांना मोहीमेवर आणू नये कारण लढाईनंतर रणभूमीवर पराभूत झाल्यास त्या स्त्रियांची मोठी वाताहत होत असे. ती थांबवण्यासाठी मोहिमेवर स्त्रीयांना आणू नये अशी सक्त ताकीद असे. युद्धात स्त्रियांना पकडू नये असा त्यांचा आदेश होता. सैनिक या आदेशाचे काटेकोर पालन करतात का? याकडे त्यांचे लक्ष असे नियमांचे उल्लंघन करणाऱ्याची काही धडगत नव्हती. स्त्रीविषयक काही गुन्हा एखाद्या सैनिकाकडून झाला तर त्यासाठी गंभीर शिक्षा होत्या. हातपाय तोडणे, डोळे काढणे, देहदंड करणे अशा शिक्षा केल्या जाई. रांझे गावच्या पाटलाने स्त्रीविषयक गैरवर्तन केल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांचे हात-पाय कलम केले होते.
सखुजी गायकवाड यांचे डोळे काढणारे शिवाजी महाराज स्त्रियांचे रक्षणकर्ते होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडी-चोळी देऊन सन्मान करणारे शिवाजी महाराज शत्रूची स्त्री शत्रू नसते तर एक स्त्री असते म्हणून शत्रूच्या स्त्रीलाही मान सन्मान देणारे शिवाजी राजे होते.स्त्री ही हिंदूची असो वा मुसलमानाची ती एक स्त्री आहे म्हणून तिचा सन्मान केला पाहिजे.आज ज्या पद्धतीने जाती धर्माच्या द्वेषातून स्त्रियांवर अत्याचार होतात. ते बघता शिवाजी महाराजांच्या विचाराचे राज्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणजेच देशातील सर्व स्त्रिया सुरक्षित होतील. इतिहासकार खाफीखान म्हणतात, ” आपल्या हातात पडलेल्या शत्रूच्या स्त्रियांची अब्रूची कदर करणारा एक महान वीर मरण पावला ” असे उदगार खाफीखान यांनी शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळाल्यावर केले होते. यावरून शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक उदार दृष्टिकोनाची आपल्याला प्रचिती येते.
शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन जेवढा उदार होता तेवढा धर्मविषयक दृष्टिकोनही उदार होता. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जेवढी मंदिर होती तेवढ्या मशिदी पण होत्या. स्वारीच्या वेळी शिवाजी महाराजांना कुराण मिळाले तर तो कुराण ग्रंथ मुस्लिम सैनिकाला देऊन त्या ग्रंथाचा सन्मान केला जाई. शिवाजी महाराजांचे धर्म विषयक धोरण हे सहिष्णू होते. अनेक मुस्लिम सरदार शिवाजी महाराजांसाठी इमानेइतबारे काम करत होते उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दौलत खान होते.तोफखाना प्रमुख इब्राहिमखान होते या उदाहरणावरून स्पष्ट होते की,शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू स्वरूपाचे होते.
शेतकऱ्याचा राजा ‘..रयतेचा राजा!
शिवाजी महाराजांचे सहकारी काही वतनदार, जमीनदार, सरदार नव्हते तर त्यांचे सहकारी होते सामान्य मावळे! गोरगरीब शेतकरी वर्गातील होते. शिवाजी राजासाठी आपला जीव देणारे होते. जीवाला जीव देणारे मावळे शिवाजी महाराजांचे खरे सैनिक होती. शिवाजी महाराजांचे सैनिक शेतकरी वर्गातील असल्यामुळे ते स्वाऱीवर जातानी शेतकऱ्यांच्या शेताची नासधूस करत नसत. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद सैनिकांना होती.शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी खऱ्या अर्थाने बळीराजा होता. दुष्काळात शेतकऱ्यांना धान्याच्या स्वरूपात मदत केली जाई. शेतसाऱ्यात ही सवलत दिली जाई. शिवराज्यात शेतकरी आत्महत्या करत नव्हते. आज एकविसाव्या शतकामध्ये शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे. दररोज कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. जगाचा पोशिंदा उपाशी आहे. भांडवलशाही व जागतिकीकरणामुळे शेतकऱ्याची दुरावस्था झाली आहे.
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अवजारे, बिनव्याजी कर्ज बी-बियाणे याची व्यवस्था करून दिली जाई.कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी शेतीची प्रतवारी ठरवली जाई. जमिनीच्या प्रतवारी वरून शेतसाऱ्याची आकारणी करत असत. रयत म्हणजे सामान्य प्रजा..रयत सुखी तर राजा सुखी तसेच शेतकरी सुखी तर राजा सुखी हा विचार शिवराज्यात महत्त्वाचा होता. रयते वरील अन्याय-अत्याचार दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वतनदारी बंद केली होती.शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. शेतकऱ्याचा राजा असेही त्यांना म्हटले जाते.
शेतकऱ्यांना मदत म्हणून बैलजोडी दिली जात असे. खाण्यासाठी धान्य नसेल तर धान्य पुरविले जाई. शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा झाला आणि शेतकरी होतकरू असेल तर त्या शेतकऱ्याचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सवलत दिली जाई. जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात चांगला माल येई तेव्हा हप्ते घेतले जाई. शेतकऱ्यावर जुलूम जबरदस्ती करण्याची कुणाची हिम्मत नव्हती कारण वतनदारावर शिवाजीराजांचे संपूर्ण लक्ष असे. शेतकऱ्यासाठी बळीचे राज्य हे कल्याणकारी होते तसेच शिवराज्यात शेतकरी वर्ग सुखी होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘विषमताधिष्टीत समाजरचना मोडीत काढण्याचा प्रयत्न करणारा राजा’ असे शिवाजी महाराजांचे वर्णन करतात. गोब्राह्मण प्रतिपालक ही शिवाजी महाराजांना दिलेली ओळख बाबासाहेबांना मान्य नव्हती. हिंदु धर्मरक्षक हिंदू धर्म संस्थापक या चौकटीत शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न काही इतिहासकारांनी केला तो बाबासाहेबांना मान्य नव्हता. राज्याभिषेक प्रसंगी काही प्रसंग घडले त्या प्रसंगातून शिवाजी महाराजांनी वर्णव्यवस्थेला जबरदस्त हादरे दिले. शिवाजी महाराज हे रयतेच्या कल्याणासाठी लढत होते त्यांची लढाईही मानवतेच्या उत्कर्षासाठी होती. कोणत्या एका धर्मासाठी ते लढत नव्हते तर मानवी कल्याणासाठी त्यांचा लढा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ” मध्ययुगातील राज्यकर्त्याच्या लढाया या शत्रूशी होत तसेच ते आपापसात ही लढत त्यांच्या या लढाया राजकीय संघर्षासाठी होत्या”. परंतु शिवाजी महाराजांचा संघर्ष हा वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था मोडीत काढण्यासाठीचा होता. शिवाजी महाराज समता, स्वातंत्र्य, न्याय, धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांचा परिपोष करणारे राजे होते.
महात्मा जोतिराव फुले शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणतात. 1869 साली महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक प्रदीर्घ पोवाडा रचला महाराजांचे कार्य घरोघरी पोहोचावे यासाठी त्यांनी 1870 साली शिवजयंती सुरु केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुण्यात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक किर्तीचे राजे होते. त्याचे गड किल्ले पाहिले की, मनामध्ये स्फूर्ती निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मुलांना कळणे आवश्यक आहे. कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज परस्त्री मातेसमान मानत त्याच पद्धतीने आपल्या मुलांनीही ही शिकवण ग्रहण करावी. इतिहासात आपण डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, स्त्रीविषयक आदर असणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज!! आपल्या मुलांच्या मनातही स्त्रियांविषयी, मुलींविषयी आदर निर्माण करण्यासाठी प्रत्येक घरात जिजाऊ निर्माण होऊन शिवाजी महाराजांसारख्या उदार दृष्टिकोनाची पिढी निर्माण करण्यासाठी एक आई म्हणून प्रत्येक स्त्रीची जबाबदारी असेल.
शिवाजीराजे म्हणजे शौर्य!
शिवाजीराजे म्हणजे कल्पकता!
शिवाजीराजे म्हणजे अमोघ संघटना कौशल्य!
शिवाजी राजे म्हणजे साहसाचे दुसरे नाव!
शिवाजीराजे म्हणजे स्वातंत्र्ययोद्धे!
शिवाजीराजे म्हणजे कुळवाडीभूषण!
शिवाजीराजे म्हणजे युगप्रवर्तक!
शिवाजीराजे म्हणजे जागतिक किर्तीचे राजे!!
चला तर मग, कल्याणकारी राज्याची कल्पना साकार करणारे छत्रपति शिवाजी महाराज घराघरात निर्माण होण्यासाठी आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचे गुण त्यांचे साहस त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी प्रोत्साहन देऊया! छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!!
लेखिका : मनिषा अनंता अंतरकर (जाधव)
संपर्क : 7822828708
ई-मेल : saiantarkar@gmail.com

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ

 

बातम्या, लेख, साहित्य आमच्याकडे पाठवा, आम्ही www.YuvaPrabhav.Com या मराठी न्यूज पोर्टल वर प्रकाशित करू. Email : yuvaprabhav@gmail.com