28 जानेवारी 1863 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना दिन..

702

स्त्रीशक्तीला ओळखून स्त्रीशक्तीला जागृत करून या स्त्रीशक्तीच्या रूपातील सावित्रीबाईंना शिक्षण घेण्यास महात्मा जोतिराव फुले यांनी प्रोत्साहन दिले.भारतातील पहिल्या शिक्षिका बनून सावित्रीबाईंनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. एक स्त्री काय करु शकते याचे उदाहरण समस्त लोकांसमोर उभे करणारे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले.स्त्री सशक्तीकरण आणि महात्मा ज्योतिराव फुले.. स्त्रियांच्या प्रत्येक समस्येला हात घालणारे महात्मा जोतीराव फुले. स्त्रियांना गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी साह्य करणारे.. शिक्षण घेऊन स्वाभिमान जागृत करणारे.. स्त्रियांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ दर्जा देणारे महात्मा जोतीराव फुले.. स्त्रियांची प्रगती झाली तर राष्ट्राची प्रगती होईल असा स्त्री जातीवर विश्वास दाखवणारे महामानव.. स्त्रियांना मन भावना आहेत स्त्रियांचे दुःख त्यांच्या समस्या सर्वप्रथम सोडवणारे फुलेदांपत्य.. स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे फुलेदांपत्य.. सतीप्रथा,विधवेचे केशवपन,बालविवाह , देवदासी प्रथा यासारख्या कुप्रथा तत्कालिन समाजासाठी घातक होत्या याची जाणीव जागृती करून या कुप्रथा बंद पाडल्या.. बालविधवांच्या आत्महत्या तसेच त्यांच्या नवजात बालकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करणारे फुलेदांपत्य. आज 28 जानेवारी याच दिवशी महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. स्त्रियांसाठी अखंड कार्य करणारे फुलेदांपत्य यांच्या कार्यापुढे नतमस्तक होण्यासाठी..

स्त्री मग ती कोणत्याही धर्माची असो वा कोणत्याही जातीचे असो या स्त्री जातीचा उद्धार करण्याचे कार्य फुले दांपत्याने अगदी इमानेइतबारे केले.एक स्त्री आपल्या कुटुंबाला पुढे नेऊ शकते. समाजाला राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकते याची जाणीव महात्मा फुलेंना होती त्यामुळेच त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले व समाजापुढे आदर्श निर्माण केला.पुढे महात्मा फुले व सावित्रीबाईच्या विचाराने फातिमा शेख सारख्या अनेक जागतिक कीर्तीच्या स्त्रियांनी राष्ट्राला घडविण्यासाठी आपले योगदान दिले व देत आहेत.

समस्त स्त्री शक्तीचा उद्धार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्त्री वर्गाला समजल्या तर आपला भारत देश महासत्ता होईलच तसेच महात्मा फुले यांचे साहित्य वाचणारा कोणताही व्यक्ती कधीही गुलामी पत्कारणार नाही.तत्वांशी तडजोड करणार नाही ,एवढी प्रचंड शक्ती त्यांच्या साहित्यात सामावलेली आहे.स्त्रीशिक्षण,स्त्रीमुक्ती,स्त्रीजागृती करण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. विधवा-पुनर्विवाहास प्रोत्साहन,बालविवाह बंदी,विधवा चे केशवपण, सती प्रथेला विरोध, देवदासीच्या समस्या, बालविवाहातून निर्माण होणारी बालविधवांची समस्या तेव्हा सर्वच उच्चभ्रू जातीत होती. तत्कालीन समाजामध्ये स्त्रियांना कोणतेही स्थान नव्हते तर विधवा स्त्रियांची काय स्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा!एकदा स्त्री विधवा झाली म्हणजे प्रत्येक दिवस तिच्यासाठी नरक यातना होत्या.एखाद्या विधवा स्त्रीला कोणी फसवले तर त्यातून त्या स्त्रीला गर्भधारणा झाल्यास त्या विधवा स्त्रीला समाजात तोंड दाखवण्यास जागा उरत नसे.तेव्हा अशा स्त्रिया एक तर आत्महत्या करत किंवा आपल्या पोटी जन्मलेल्या बालकाची हत्या करत.अशाच एका काशीबाई नामक विधवा स्त्रीने आपल्या बाळाची हत्या केली म्हणून त्या स्त्रीला काळ्यापाण्याची शिक्षा झाली. या घटनेमुळे फुले दांपत्य हळहळले आणि त्यांनी पुढाकार घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. हे भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह होते. या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या बाहेर एक पाटी लावली होती. त्यावर लिहिले होते की, “अडल्यानडल्या बाईने येथे यावे बाळंत व्हावे वाटले तर मुल घेऊन जावे नाहीतर येथेच सोडून जावे, आम्ही सांभाळ करू” सावित्रीबाई आपल्या बावनकशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहात या बालहत्या प्रतिबंधक गृहाचा उल्लेख करतात.

पथा चुकल्या कामिनी पोटुशीना

प्रसूतिगृह ही सोय मोलाची नाना

सुईणी दवा पाणी खाणेपिणे ही 

व्यवस्था अशी सर्व सावित्री पाही!!!

बालहत्या प्रतिबंधक गृहात सावित्रीबाईने पस्तीस उच्चवर्णीय ब्राह्मण स्त्रियांची बाळंतपण केली. तसेच काशीबाई नामक विधवा स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलास त्यांनी दत्तक घेतले. महात्मा फुले समाजापुढे अगदी कृतीतून आदर्श घालून देत होते. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केल्यामुळे विधवा स्त्रियांना सन्मानाने जगता आले तसेच त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरांना ही सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. आणि विधवा स्त्रियांकडून होणारे पातकही थांबले. एक प्रकारे समाजाला योग्य दिशा मिळाली. आणि विशेषतः उच्चवर्णीय स्त्रियांची होणारी दशा थांबली. लक्षात घ्यायची गोष्ट आहे की, उच्चवर्णीय स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी फुले दांपत्यांनी पुढाकार घेतला. समाजाचा विरोध पत्कारला. उपहास संघर्ष वाट्याला आला परंतु त्यांनी माघार घेतली नाही. कदाचित फुले दांपत्य थांबले असते तर आज विविध क्षेत्रात स्त्रियांनी जो आपल्या कार्याचा ठसा उमटवला त्याच्या खुणा गडद झाल्या नसत्या.. म्हणून प्रत्येक स्त्रीने मग ती कोणत्याही जातीची असो वा धर्माची असो उच्चवर्णीय असो वा कनिष्ठ वर्णीय असो फुले दांपत्याच्या विचाराचा प्रचार प्रसार करून त्यांचे विचार कृतीत उतरवले पाहिजेत.फुले दांपत्याचे कार्य समजून घेऊन समाजाला राष्ट्राला दिशा देण्याचे कार्य केले पाहिजे.म्हणूनच प्रत्येक स्त्रीने मानवतावादी विचारांची कास धरावी. मानवतेचा उद्धार करणारे फुलेदांपत्त्यानी सर्व जाती-धर्माच्या स्त्रीयांसाठी कार्य केले.सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांनी त्यांच्या विचाराचे आदर्श घेऊन महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करावा कारण फुले दांपत्याचे कार्य एकम य राष्ट्र निर्माण करणारे होते.अन्यायाला वाचा फोडणारे होते.माणसाला माणसाप्रमाणे जगण्यासाठी प्रेरित करणारे होते. म्हणून स्त्री वर्गाने फुले दांपत्यांना विचाराने, कृतीने स्वीकारले पाहिजे.मानवता धर्मासाठी कार्य करणारे फुलेदांपत्य कोणत्याही एका जातीत बंदिस्त होऊ शकत नाही. महात्मा फुले यांनी आधुनिक भारत आपल्याला दाखवला. या आधुनिक भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे कार्य संपूर्ण स्त्री जातीने करावे यासाठी आधुनिक विचारांचा पाया फुले दांपत्याने घालून दिला.हा पाया मजबूत करण्यासाठी सर्व जातीधर्माच्या स्त्रीयांनी पुढाकार घ्यावा.

चला तर मग विचाराने कृतीने फुले दाम्पत्यांना स्वीकारून त्यांच्या क्रांतिकारी विचारांची मशाल पेटती ठेवून क्रांतीच्या ज्वालाना स्फुरण देऊन आधुनिक भारताचा पाया भक्कम करूया.वैज्ञानिक विचारांची कास धरून आपल्या पिढीला वैज्ञानिक विचारांचा वारसा देऊया. समाजातील दीनदुबळ्या स्त्रीयांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहूया. गुलामीत जगणाऱ्या अन्याय-अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रियांना मुलींना त्यांच्या मानवी हक्काची जाणीव करून देऊया.शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणूया. नैतिकता माणुसकी जपणारी एक आदर्श पिढी निर्माण करूया.

 

लेखिका – मनीषा अंतरकर (जाधव )

अंबड, जिल्हा जालना

संपर्क : 7822828708

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ

 

बातम्या, लेख, साहित्य आमच्याकडे पाठवा, आम्ही www.YuvaPrabhav.Com या मराठी न्यूज पोर्टल वर प्रकाशित करू. Email : yuvaprabhav@gmail.com