महाराष्ट्र गुदमरला; नाशिक मध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू…

303

नाशिक : राज्यात करोनाचे थैमान सुरू असतानाच हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे आज महाराष्ट्र गुदमरला. राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा सुरू आहे. त्यातच नाशिक मधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया :- 

“ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाले आणि त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती स्थानिक प्रशानसनाने दिली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनपा आयुक्तच यासाठी जबाबदार असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.