रामदास आठवले यांची शेतकरी आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया…

312

अहमदनगर – कृषी कायद्यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतलं, तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.

भारतातील आघाडीचे उद्योजक असलेल्या अदानी आणि अंबानी यांचा संबंध कृषी कायद्यांशी जोडणे योग्य नाही. ते चुकीचे आहे. अदानी आणि अंबानी यांचे व्यवसाय वेगळे आहेत. कृषीमालावर ते अवलंबून नाहीत. या कायद्यामुळे ते कृषी मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येतील असं नाही, असं रामदास आठवले म्हणालेत. आंदोलक शेतकऱ्यांची कृषी कायदेच मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी असून, ती पूर्णपणे अयोग्य आहे, असं रामदास आठवले म्हणालेत.