‘रिपब्लिकन’ ऐक्य आता होणे शक्य नाही….

355

शिर्डी : “मी प्रकाश आंबेडकर यांना एनडीएमध्ये या म्हणालो होतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण, त्यांच्या पक्षानं मतं खाण्याचं काम केलं, त्याचा उपयोग समाजाला झाला नाही. वास्तविक पाहता जेव्हा आम्ही सगळे एक होतो, त्यावेळेला चार खासदार तरी निवडून आलेले होते, पण आता त्यांचा एकही खासदार व आमदार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी सोबत यावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एकत्र येणार का? या प्रश्नावर रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘रिपब्लिकन ऐक्य आता होणे शक्य नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन नेतृत्व कोणाचे मान्य नाही, म्हणून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. त्यांना आमचे नेतृत्व मान्य नव्हते. वास्तविक पाहता मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतो’, असं आठवले यांनी स्पष्ट केले.

‘तसंच, पण, आता वेळ निघून गेलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरी भाजपसोबत येण्याचा विचार केला तरी भाजपला त्यांची गरज नाही, असंही आठवले यांनी आवर्जून सांगितले.

‘महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देशातील विरोधकांच्या म्हणजे यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पुढे येऊ लागलेला आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा मला आदर आहे, त्याबद्दल दुमत नाही. मात्र, दुसरीकडे काँग्रेस पक्ष हा देशांमधील राष्ट्रीय पक्ष आहे. सध्या सोनिया गांधी त्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे यूपीए अध्यक्षपद हे साहजिकच त्यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेने या पदावर पवारांच्या नियुक्तीची केलेल्या मागणीमुळे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते. काँग्रेसने याचा सारासार विचार केला पाहिजे व प्रसंगी राज्याच्या सत्तेतून सुद्धा बाहेर पडले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे आठवले यांनी सांगितले.

‘जर काँग्रेसच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर भारतीय जनता पार्टी राज्यांमध्ये सत्ता स्थापन करेल, त्यासाठी आम्हाला कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल मग आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करू, असंही आठवले म्हणाले.