स्व. राजीव गांधी स्मृतिदिन : राजर्षी पीपल्स फोरम कडून विनम्र अभिवादन…

446

भारतातील तंत्रज्ञान युगाचे प्रवर्तक, धाडसी व कल्पक व प्रतिभावंत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना स्मृतीदिनी राजर्षी पीपल्स फोरम कडून विनम्र अभिवादन करण्यात आले.

वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. देशात पिढी बदलाचे अग्रदूत श्री. राजीव गांधी यांना इतिहासातील सर्वाधिक जनादेश मिळाला होता. आपल्या मातोश्रींच्या हत्येच्या दुखातून सावरल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला मागील सात निवडणुकांच्या तुलनेत लोकप्रिय मते अधिक प्रमाणात मिळाली. पक्षाने 508 जागांपैकी 401 जागा मिळवून एक विक्रम केला.

शालेय शिक्षणानंतर श्री. राजीव गांधी केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात गेले. पण लवकरच त्यांनी लंडन स्थित इम्पिरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यास केला. विमान उड्डाण आकाशात उडणे ही त्यांची सर्वात मोठी आवड होती. त्यामुळेच हे अपेक्षितच होते की इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवले. लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले.

अखेर 1980 मध्ये भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पाहायला मिळाला. संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. 1988 मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टे सोबत संघर्षात झाली. 1991 च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी 21 मे रोजी लिट्टेकडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी सोनिया गांधी व मुलगा राहुल व मुलगी प्रियंका राजकारणात आहेत.