“मला न्याय पाहिजे, नाहीतर मी आईच्या हत्येचा बदला घेईन…”

767

औरंगाबाद : ‘मला बाबा नाहीत. आई व बहिणीचा खूप मोठा आधार होता. आता तोही गेला. मला न्याय पाहिजे. आरोपींना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे. नाही तर मी बदला घेईल…’ हे संतप्त शब्द आहेत नववीत शिकणाऱ्या नितीन बनकरचे. सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी त्याची आई आणि बहिणीचा मृतदेह गावातीलच विहिरीमध्ये आढळून आला. २१ फेब्रुवारी रोजी गावात जलदान विधीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थित असंलेल्या पोलिसासमोर गावकऱ्यांनी आक्रोश केला. या मायलेकींवर अत्याचार होऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला.

नितीनची मृत आई वंदना (३२) आणि बहिण भारती (७) शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी रोजच्या प्रमाणे बकऱ्यांना चारा आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत त्या घरी परत आल्या नसल्याने नितीनची आजी शेजारच्या लोकांसोबत त्यांचा शोध घ्यायला निघाली. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यानंतर तिने सिल्लोड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली.

सोमवारपर्यंत पोलिसांनाही शोध घेता आला नाही. सोमवारी गावातीलच विहिरीत सकाळी १० वाजता दोघींचे मृतदेह आढळले. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी घाटीमध्ये नेण्यात आले. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता मृतदेह गावात आणले आणि रात्री आठ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावातील लोकांना हत्येचा संशय आहे. रविवारी गावातील विहिरीत पाहिले. मात्र, त्या दिवशी प्रेत नव्हते. सोमवारी ते तरंगताना दिसले. वंदनाची जीभ आणि डोळे बाहेर आले होते. त्यांना आधी गळफास दिला, नंतर विहिरीत फेेकले असावे. वंदना घरातून जाताना तिच्या सोबत विळा, चारा बांधण्यासाठी साडीचे गाठोडे आणि पायात चप्पल होत्या. मात्र, या वस्तू कुठेच सापडल्या नाहीत.

सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. तपास अधिकारी फौजदार पी. पी. इंगळे, उपसरपंच व पोलिस पाटीलही उपस्थित होते. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतरच पुढील कारवाई होईल, असे इंगळे म्हणाले.

YuvaPrabhav सोबत कनेक्टेड राहा.

बातम्या व इतर अपडेट साठी आम्हाला फेसबुक वर लाइक आणि ट्विटर वर फॉलो करा..