पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या पाण्याचे थैमान; कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला प्रचंड फटका

552

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजला आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर, नौदल आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

साताऱ्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कोयना धरणाचे ६ दरवाजे सोळा फुटांवरून चौदा फुटांपर्यंत खाली आणून विसर्ग कमी करण्यात आला आहे. कराड येथील पुराचे पाणी आता ओसरू लागले असून ६ हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कराड आणि पाटणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू अाहे. त्यांच्या जेवणाची व आरोग्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील ९० गावे पूरग्रस्त असून ५ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याने कराड तालुक्यातील ४,२५८, पाटण तालुक्यातील ७८६, फलटण तालुक्यातील ५४९, सातारा तालुक्यातील ४६५, महाबळेश्वर तालुक्यातील १६१ व जावली तालुक्यातील ४३ अशा एकूण ६,२६२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

# तिनही जिल्ह्यांत अनेक गावांचा संपर्क तुटला.

# कोल्हापूर जिल्हा : १२९ गावांतील ३५,५१४ लोकांचा संपर्क तुटला
# सातारा जिल्हा : कृष्णाकाठच्या ६ गावांतील ८०० लोकांचा संपर्क तुटला
# सांगली जिल्हा : १८ गावे संपर्कात नाहीत. कोयना धरणातून विसर्ग कमी झाल्याने पाणी पातळी घटत आहे.
# महाबळेश्वर व वाई भाग : सतत पाऊस कोसळत असल्याने कृष्णेच्या खोऱ्यात पूरपरिस्थिती कायम आहे.