शिवसेना-भाजपचं भांडण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण : प्रकाश आंबेडकर

नाशिकच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी केले जबरदस्त शक्तिप्रदर्शन.

691

नाशिक : शिवसेना-भाजपचं भांडण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे. नवरा-बायकोचं भांडण असतं तर घटस्फोट झाला असता. अमित शाह प्रियकर आणि उद्धव ठाकरे प्रेयसी आहे. अमित शाह हा प्रियकर ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंचे नवे प्रियकर आहेत, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे व भारिप चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी ते बोलत होते.

१० टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. आरक्षणाचा गेम त्यांच्यावरच उलटणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नोटबंदी ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना फायदा व्हावा, नोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसा बाहेर यावा म्हणून घेतला नव्हता. भाजपा वाल्यांनी सांगावे की, जूनमध्ये मोदी अमेरिकेला गेले होते, तेंव्हा डेबिट व क्रेडिट कार्डचा करार केला की नाही? असा सवाल त्यांनी केला. आपला देशाचा पंतप्रधान ब्लॅकमेल होतो आहे, जे सरकार ब्लॅकमेल होते, असे सरकार हद्दपार व्हायलाच हवे. असेही आंबेडकर म्हणाले.

भटजी हा नेहमी मागत असतो, तो कधीच देत नाही. त्यामुळे हे सरकार दुष्काळात काहीच देणार नाही. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.