सहलीला गेलेल्‍या अल्पवयीन मुलींचा बसचालकाकडून विनयभंग

36

कर्जत (प्रतिनिधी) : नेरळ येथे सहलीसाठी आलेल्या पाच शाळकरी अल्पवयीन मुलींचा बसचालकाने विनयभंग केला असल्याची घटना समोर आली आहे. नेरळ पोलिसांकडून आरोपी बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुलुंड येथील एका स्कूलमधील शालेय विद्यार्थी खासगी बसने नेरळ-मालेगाव येथील सगुणा बाग येथे सहलीसाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथील स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची सहल ही नेरळ मालेगाव येथील कृषी पर्यटन स्थळ असणाऱ्या सगुणा बाग येथे आली होती. या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक हे बस क्रमांक एमएच ४३ बीपी ४२९८ मध्ये बसचालक अंकुश संजय अडागळे (२८) सोबत आले होते. सायंकाळी सहा वाजता विद्यार्थी परतीच्‍या प्रवासाला निघाले. ही बस रात्री उशिरा आपल्या मुलुंड शाळेजवळ पोहचली होती. बसमध्ये आपल्यासोबत चालकाकडून घडलेल्या गैरवर्तणुकीची माहिती पाच विद्यार्थिनींनी घरी पोहचल्यानंतर पालकांना दिली

याबाबत पालकांनी शालेय व्यवस्थापक व शिक्षकांना माहिती दिली तर मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत घडल्याने याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर चालक अंकुश संजय अडागळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.