#बेडग_लाँग_मार्च : बेडगमध्ये डॉ आंबेडकरांची पाडण्यात आलेली कमान ‘या’ मार्गावर उभारणार; महेश कांबळेंची माहिती..

112

Sangali : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीसाठी बेडग ता. मिरज येथील आंबेडकरी समाजाचा लाँग निघालेला आहे. राज्य सरकारने मिरज-बेडग-आरग रस्त्यावर कमान उभारणीसंदर्भात पत्र दिल्यामुळे खेड शिवापूर येथे लाँगमार्च थांबवण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात मिरज-बेडग-आरग या मार्गावरील रस्ता क्रमांक ४५ बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान (Dr. Babasaheb Ambedkar Welcome Arch) उभारण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

पत्रातील शासननिर्णय अभ्यासाअंती तपासून जागानिश्चिती, निधी मंजुरी, किती दिवसांत कमान उभी राहील याची हमी मिळण्याकरिता १० ऑक्टोबरपर्यंत लाँगमार्च थांबवला आहे. मागणीप्रमाणे कार्यवाही झाल्यास स्थगित करणार असल्याची माहिती डॉ. महेशकुमार कांबळे (Mahesh Kumar Kamble) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कमानप्रश्नी दुसरा लाँगमार्च बेडग (Bedag Gram Panchayat), माणगाव ते मुंबई मंत्रालय असा निघाला. खेड शिवापूर येथे पोहोचल्यानंतर सांगलीचे उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलिस अधिकारी व मिरज सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांनी बौद्ध समाजबांधवांची भेट घेऊन जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले, मागण्या मान्य केलेले संयुक्त पत्र दिले.

सार्वजनिक बांधकाम विभाग (मुंबई)चे कक्ष अधिकारी सुरुची बदले यांनीदेखील आरग-बेडग-लिंगनूर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४५ वर कमान उभारण्यासाठी शासनाकडून नाहरकत देत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे. पिंपरीत किंवळेमध्ये लाँगमार्चमधील सर्व बौद्ध समाजबांधव थांबले आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या मनात शंका आहेत. त्यांच्या निरसनासाठी राज्य शासन व प्रशासनाला वेळ दिल्याचे कांबळे यांनी पत्राद्वारे सांगितले. बोलवाडचे माजी सरपंच सचिन कांबळे, मालगावचे तुषार खांडेकर, अरविंद कुरणे, स्वप्नील बनसोडे, सागर आवळे, एरंडोलीचे उमेश धेंडे, धनराज कांबळे उपस्थित होते.