धर्मशास्त्र व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

153

धर्मशास्त्र व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक – डॉ. सर्वपल

राधाकृष्णन हे विसाव्या शतकातील तुलनात्मक धर्म व तत्वज्ञानाचे सर्वात प्रतिष्ठित विद्वानांपैकी एक होते. राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदांतावर आधारित होते. त्यांनी या परंपरेची समकालीन आकलनासाठी पुनर्व्याख्या केली. ज्याला ते “अज्ञात पाश्चात्य टीका” म्हणायचे, त्याच्यापासून त्यांनी हिंदू धर्माचा बचाव केला. समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात राधाकृष्णन यांनी योगदान दिले. भारत आणि पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. भारत आणि पश्चिम जग यांच्यामध्ये पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.

1931 मध्ये नाइटहूड, 1954 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि 1963 मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल केले गेले. हेल्पेज इंडिया या भारतातील वृद्ध वंचितांसाठी एक ना-नफा संस्था असलेल्या संस्थापकांपैकी ते एक होते. राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की “शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत.” 1921 ते 1932 या काळात कलकत्ता विद्यापीठातील किंग जॉर्ज पंचम मानसिक आणि नैतिक विज्ञान या विभागाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातील पूर्व धर्माचे स्पॅल्डिंग चेअर आणि नैतिकता विभागाचे 1936 ते 1952 पर्यंत ते अध्यक्ष होते.

चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही. ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.

एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता. संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.

धर्म आणि तत्वज्ञान या विषयांप्रमाणेच त्यांचा शिक्षण या विषयावरही उत्तम अभ्यास झालेला होता. स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. त्यासाठी 1948 ला भारत सरकारने पहिला शिक्षणआयोग स्थापन केला. त्या आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ति झाली. तत्वज्ञान विषयक त्यांचे ग्रंथ जगभर गाजले, भारतीय धर्माचे श्रेष्ठपण दाखवून देणारेही त्यांचे ग्रंथ आहेत.

इंग्लंडला भरलेल्या “आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदे” साठी भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली होती. पुढे अनेक देशात त्यांनी हिंदु धर्माचे गाढे अभ्यास असल्यामुळे हिंदूधर्म तत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. अस्खलीत इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे अक्षरश ब्रिटीश सरकारने त्यांच्या मधील सुप्तगुणांचा आदर म्हणुन “सर” हा बहुमानाचा किताब देवून एका भारतीय विद्वान शिक्षकाचा गौरव केला. तेव्हा पासूनच “सर” ही उपाधी त्यांना कायम स्वरुपी मिळाली.

प्राध्यापक असल्या पासून त्यांनी शिक्षकाच्या भूमीकेत कोण-कोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्वत:च्या उदाहरणाने दाखवून दिले. आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पध्दतीने आपले विचार दुसऱ्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच “आदर्श शिक्षक” होता येईल, हाच त्यांनी “आदर्श शिक्षक” बनण्यासाठी दिलेला संदेश होता. असा तत्वज्ञविद्वान, प्रवक्ता, कुशल प्राध्यापक, लेखक, चिंतक अशा विविध नात्यांनी डॉ. राधाकृष्णन विश्वविख्यात झालेत, म्हणुनच त्यांचा आदर्श ठेवूनच “शिक्षकदिन” साजरा होत असतो.

डॉ. राधाकृष्णन यांनी खऱ्या गुरुची कल्पना अतिशय सर्वोत्कृष्ट शब्दात मांडली आहे. त्यांच्या मते खरा गुरु तोच की जो विद्यार्थ्यांचा केवळ बौध्दिक नव्हे तर आध्यात्मिक अंध:कारही नाहीसा करील. ज्याचा आचार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य ! तो विद्यार्थ्यांना सद्गुण व चांगुलपणा यांची प्रेरणा देत असतो. शिक्षक हा केवळ माहिती देत नाही तर आत्म्याची शक्ति तो शिष्यांमध्ये जागृत करतो. शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षणही एक यांत्रिक क्रिया बनते. शिक्षक आपल्या समोर कोणते चारित्र्यपूर्ण आदर्श ठेवतात याचे महत्व मुलांना असते. आदर्श शिक्षकांची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. शिक्षण क्षेत्रातील अनास्था दूर करण्यासाठी डॉ. राधाकृष्णनच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ या !

खऱ्या अर्थाने आईनंतर जर कुणी संस्काराची जबाबदारी पार पाडत असेल तर ते शिक्षकच पार पाडतात. लहानपणी आईचे बोट धरुन चालणारे हात मोठेपणी शिक्षकाच्या तालमीत समाजात उभे राहण्याचे धाडस करतात. परंतू आजच्या घडीला शिक्षक आपली शिक्षणाची जबाबदारी किंवा विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम खरंच प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत काय ? हे सुध्दा लक्षात घेतले पाहिजे.

प्रत्येक शिक्षकांनी एकांतवास व आत्मचिंतन याचे महत्व समजुन घेतले पाहिजे. कारण आपले ह्रदय व मन प्रसन्न ठेवण्याची आत्मचिंतन ही गुरुकिल्ली आहे. त्यामुळे प्रसन्नचित्त होवून आकलन शक्ति वाढते व बुध्दि स्थिर होवून स्मरण शक्तीत वाढ होत जाते. हा दिव्यमंत्र शिक्षकांनी आत्मसात करावा, हा हितोपदेश त्यांनी शिक्षकांना आवर्जुन सांगीतला. हिंदूधर्माचा तत्ववेत्ता आणि जगप्रसिध्द तत्वज्ञ म्हणुन भारत सरकारने त्यांना “भारत-रत्न” हा सर्वोच्च किताब बहाल केला. एका थोर विद्वानाचा तो यथोचित सन्मान होता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणजे खरोखरच आधुनिक जगातले एकश्रेष्ठ दर्जाचे प्रगल्भ विचारवंत आणि तत्वज्ञ होते. त्यांच्या ठायी असलेली अलौकीक ज्ञानसंपदा त्यांच्या नसा-नसांत भिनलेली होती, हे सर्वश्रुतआहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा अमीट ठसा “आदर्श शिक्षक” म्हणून शिक्षण क्षेत्रात उमटविला. एकदा डॉ. राधाकृष्णन धीर गंभीर मुद्रेमध्ये असतांना एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले “सर”, आपला जन्मदिवस येतो आहे साजरा करण्याचा मानस आहे. त्यावर लगेच डॉ. राधाकृष्णन म्हणाले, माझा जन्मदिवस साजरा करायची गरज नाही, तो जर साजरा करायचा असेल तर तो “शिक्षकदिन” म्हणून पाळावा आणि तेव्हापासूनच 5 सप्टेंबर हा दिवस “शिक्षकदिन” म्हणून डॉ. राधाकृष्णनांच्या नांवे पाळला जात असतो ही वास्तविकता आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. 1952-1962 पर्यंत ते उपराष्ट्रपती राहिले. ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (1962-1967) होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

शिक्षक आणि शिष्य यांचा समन्वय घडवून आणण्याकरीता जे शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन चांगल्या विद्यार्थ्यांवर संस्कार करतात त्यामुळे त्या शिक्षकाचा आदर्श शिक्षक म्हणुन गौरव करण्यात येतो. याच दिवशी शासनाकडूनही देखील आदर्श शिक्षक म्हणुन त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगीरीचा सन्मान केला जातो. आपल्या गुरुजनांपैकी अनेकांना “आदर्श शिक्षक” म्हणून सन्मान प्राप्त झालेत, तरी देखील “शिक्षक दिन” हा शालेय जीवनातला अतिमहत्वाचा दिन म्हणून संबोधण्यात येते. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मानाचा मुजरा !

लेखक : प्रविण बागडे (नागपूर )

भ्रमणध्वनी : 9923620919

ईमेल : pravinbagde@gmail.com

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ