पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा लागला कलंक; पँथर दिपक शेजवळचा खून करून मृतदेह लटकावला ..

863

संभाजीनगर(औरंगाबाद) : पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा कलंक लागला आहे. पुन्हा एक जातीयवादी हत्याकांड घडले आहे. पुन्हा एक आंबेडकरी समाजाचा होतकरू कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडवून आणले आहे. त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजात असंतोष पसरला आहे. फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथील मातंग समुदायातील आंबेडकरी कार्यकर्ता दिपक शेजवळचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मृतदेह लटकविण्यात आला आहे.

सदरील प्रकार हा ठरवून केलेले हत्याकांड आहे असा आरोप दिपक शेजवळ यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे. दिपक शेजवळ हा ऑल इंडिया पँथर सेनेचा पदाधिकारी होता.

कायद्याचा धाक नसलेले गुन्हेगार सर्रास लोकांचे मुडदे पाडीत आहेत व पोलीस प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन पडले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळते हे उघड आहे, शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अमानवी गुन्हेगार पोसले जातायेत हे दुर्दैवी आहे. असा घणाघात ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे.

पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे, आंबेडकरी समुदाय शेजवळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे व न्याय मिळेपर्यंत लढा देऊ असे दिपक केदार यांनी म्हटले आहे.

अतिशय सुनियोजितपने हे हत्याकांड झालेले आहे. दिपक शेजवळ हा वाळूज एमआयडीसी मध्ये कंपनीत काम करत होता. त्याचे आई वडील मजुरीचे काम करतात. गरीबी, दारिद्र्य याच्याशी झुंज देत देत आंबेडकरी चळवळीत सक्रिय असा हा कार्यकर्ता होता. ऑल इंडिया पँथर सेनेची शाखा दिपक शेजवळ ने गावात उघडली होती.

दिपक हा आई – वडिलांना भेटायला गावी आला असताना त्याला रात्री एक कॉल आला होता.  तो बोलत बोलत बाहेर गेला तो परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह संशयास्पदरित्या लटकलेले अवस्थेत आढळून आला.  सुनियोजित पणे हे हत्याकांड घडविण्यात आले आहे. असा आरोप दिपक शेजवळ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करावी, पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा आंबेडकरी समाजाने दिला आहे.