अग्रलेख | अव्वल स्थानी असणाऱ्या महाराष्ट्राची शिक्षण क्षेत्रात पिछेहाट..

477

महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे, हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. सर्व जनता राजकीय तमाशा बघत आहे. परंतु ह्या सर्व सत्तानाट्यात एक महत्वाची बातमी दुर्लक्षित केली जात आहे. ती बातमी आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहे. ज्याप्रमाणे आपल्या राजकीय पुढाऱ्यांचा स्तर घसरत चालला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा स्तर घसरला आहे. याकडे कुणाचेच लक्ष जात नाहीय. हे देखील तेवढेच विशेष आहे.

पुरोगामी महाराष्ट्र, शिक्षण क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र अशी ओळख आपल्या महाराष्ट्राची होती. परंतु धोरण नसलेले आणि अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे असे आता म्हणण्याची वेळ आली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे अभियान राबवून देशातील पहिल्या तीन राज्यांमध्ये स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राचा शैक्षणिक निर्देशांक आता घसरला आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शैक्षणिक सत्र 2021-22 साठी ‘पीजीआय’ म्हणजेच ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0’ अहवालात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर घसरला आहे.

केंद्र सरकारकडून शालेय शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन करण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हे सर्वेक्षण करण्यात येते. मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याची शिक्षण व्यवस्था ही सातत्याने पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. पण आता 2021-22 च्या अहवालानुसार राज्याची शिक्षण व्यवस्था क्रमवारीत सातव्या क्रमांकावर घसरली आहे. ही मोठी पिछेहाट मानली जात आहे.

राज्यनिहाय अहवालासोबतच केंद्र सरकारने प्रत्येक राज्याचा जिल्हानिहाय शैक्षणिक निर्देशांकही जाहीर केला आहे. हा जिल्हानिहाय अहवाल 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. जिल्हानिहाय जाहीर झालेल्या शिक्षण निर्देशांकात तर बहुतांश जिल्ह्यांची शैक्षणिक पडझड झाल्याचेच चित्र समोर आले आहे.

अहवालातील आकडेवारी राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेची चिरफाड करणारी आहे. पालक विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी आहे. मात्र ह्या कशाचेही सोयर सुतक राज्यकर्त्यांना नाही. सत्तेचा लाभ, पद कुठून आणि कशी मिळवायची यात राज्यकर्ते मश्गूल आहेत. आणि ह्यांचा हा तमाशा बघण्यात जनता दंग आहे.

अव्वल असणाऱ्या महाराष्ट्राची पिछेहाट चिंतेचा विषय आहे. परंतु चिंता करणार कोण? राज्यकर्ते ज्यांना काही पडले नाही. आणि जनता तिला काही देणेघेणे नाही.

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)