कविता – राजर्षी शाहू महाराज

184

समाजकंटक परंपरांची केली, कायदेशीर पाठवणी
शाहू महाराजांनी दिली, बोथट विचारांना संजीवनी

सत्ता, वैभव, नावलौकिकाची, मुळीच नव्हती आस
जनकल्याणासाठीच घेतला, जीवनाचा हरेक श्वास

मोफत अन् सक्तीच्या शिक्षणाचे, केले बीजारोपण
बहुजनांच्या उद्धारास दिले, पन्नास टक्के आरक्षण

सवर्ण अन् अस्पृश्यांना, बसविले सारख्याच पंक्तीत
जातीभेद नष्ट करून, मानवास आणले माणुसकीत

वर्षानुवर्ष चालूच होती, अनिष्ट चालीरितींची क्रुरता
समतेच्या गारव्याने, शमवली स्त्रीजातीची दाहकता

राधानगरी धरणाची, तुम्हीच साकारली संकल्पना
विविधांगी कल्पनेतून, कृषीविकासास दिली प्रेरणा

बाबासाहेबांच्या शिक्षणाचा, पेलला आर्थिक भार
कलाप्रेमींच्या प्रगतीस, राजाश्रयातून दिला आधार

उद्योगधंद्यांस देवून साथ, रोजगार केला उपलब्ध
चरितार्थाने उजळला, तरूण बेरोजगारांचा प्रारब्ध

शिवविचारांचा, परिवर्तनाचा, बुलंद असा आवाज
महाराजांचे महाराज आमचे, राजर्षी शाहू महाराज

मीता अशोक नानवटकर
सावनेर,नागपूर.

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात / कवितेत व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ