माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमीत्त महाराष्ट्र शासनाने रमाईच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करावी – रामदास आठवले

188

मुंबई दि. ०१ – त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५ वे) जयंती वर्ष असून त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मीती करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

माता रमाई या केवळ रडणा-या नसून लढणा-या रमाई आहे असे खंबीर रमाईचे चित्र एकपात्री प्रयोगाद्वारे सादर करणा-या परभणी येथील अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी नुकतीच केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेवून माता रमाई यांच्या जीवनावर शासनातर्फे चित्रपटाची निर्मीती करण्याची मागणी केली. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून माता रमाई यांच्या जीवनावर राज्य शासनाने चित्रपटाची निर्मीती करण्याची आपण मागणी करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले. अभिनेत्री प्रियांका उबाळे यांनी स्वकष्टाने माता रमाई यांच्या जीवनावर लघुपट निर्माण केला असून त्या गावागावात रमाई च्या जीवनावरील लघुपट दाखवून एकपात्री प्रयोग सादर करीत असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून माता रमाई च्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती शासनाने करावी अशी मागणी जोर धरत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.