अग्रलेख | भाजप नेत्याची, चेष्ठा करताना राष्ट्रपतींचा उल्लेख कशाला…?

भास्कर जाधव यांनी राष्ट्रपती च्या नावाची टिंगल केली. हे वास्तव आहे. हा राष्ट्रपती पदाचा, द्रौपदी मुर्मु यांचा, समस्त आदिवासी समाजाचा, आणि महिला वर्गाचा अपमानच आहे.

294

( प्रफुल कांबळे) | नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता सद्य परिस्थिती मध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन पक्ष निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना नावे आणि चिन्ह दिली आहेत. त्यातच आता अंधेरी पोटनिडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवसैनिकांमध्ये जोश आणण्यासाठी महाप्रबोधन यात्रेचे आयोजन केले आहे. परंतु ही यात्रा आता वादात सापडली आहे. ह्या यात्रेतील आक्रमक आणि वादग्रस्त भाषणामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक / पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील झाले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक, बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात आहेत. अशा परिस्थितीत शिवसैनिकांना मार्गदर्शन, प्रबोधन करून त्यांना आपल्या सोबत ठेवण्याचे खडतर आव्हान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षा समोर आहे. असे असताना उगाच शाब्दिक कोटी करून कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणे. राष्ट्रपती बाबत अनावश्यक वक्तव्य करणे ह्या मुळे ठाकरे गटाचे नेते वादात अडकले आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी तर भाजपच्या किरीट सोमय्या यांच्या वर टीका करताना थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उल्लेख केला. 10 ऑक्टोबर रोजी ठाणे शहरातील गडकरी रंगायतन सभागृह येथे ठाकरे गटाची महाप्रबोधन सभा झाली. ह्या सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि राष्ट्रपती पदाचा खिल्ली उडवल्याचा आरोप, त्यांच्यावर करण्यात येत आहे.

भास्कर जाधव यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची टिंगल करताना जाधव यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा उल्लेख केला होता. त्यांच्या संबधित वादग्रस्त वक्तव्यामुळे भास्कर जाधव यांच्यावर ठाणे आणि गोंदिया येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भास्कर जाधवांनी महाप्रबोधन यात्रेदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख शिवहरे यांनी गोंदिया शहर पोलिसांत भास्कर जाधवांविरोधात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात, गोंदिया हा जिल्हा आदिवासीबहुल असल्यानं नागरिकांमध्ये त्यांच्याविरोधात मोठा रोष आहे. त्यामुळं त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते शिवहरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. याशिवाय भास्कर जाधवांनी आदिवासी बांधवांचाही अपमान केला असून त्यांना अटक न झाल्यास आंदोलनाचाही इशारा शिवहरे यांनी दिला आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केली नाही. त्यामुळे नक्कल केली म्हणून कोणी सिद्ध करू शकणार नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. देशाच्या राष्ट्रपती यांचं नाव घेणे काही गुन्हा आहे का?, असा सवालही भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ह्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. देशाच्या प्रथम नागरिक आहेत. त्या आदिवासी समाजातून येतात. त्यांचा जीवनपट हा मोठा संघर्षमय आहे. त्या एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. मग तुमच्या राजकीय वादात राष्ट्रपती बाबत नाहक, अनावश्यक उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या बोलण्याच्या शैलीवर टिका करताना भास्कर जाधव यांनी राष्ट्रपती च्या नावाची टिंगल केली. हे वास्तव आहे. हा राष्ट्रपती पदाचा, द्रौपदी मुर्मु यांचा, समस्त आदिवासी समाजाचा, आणि महिला वर्गाचा अपमानच आहे.

ह्या गंभीर वादग्रस्त वक्तव्याची दखल घेवून दोन गुन्हे दाखल झाले आहेत. भास्कर जाधव यांना अटक होईल की नाही हे पुढील काळ ठरवेलच. परंतु तुमच्या राजकारणात निदान सामाजिक भान ठेवून वक्तव्ये करावीत. हि माफक अपेक्षा…

 

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

(kampraful@gmail.com)

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)