अग्रलेख | रस्ते अपघातांच्या निमित्ताने…

तुम्ही काही VIP नाहीत. तुमच्या जगण्या मरण्याने कोणत्याही यंत्रणेला काडीचाही फरक पडत नाही...

283

(प्रफुल कांबळे) :  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई – पुणे महामार्गावर अपघात झाला. घटनास्थळी त्यांना जवळ जवळ एक तास मदत उपलब्ध होवू शकली नाही. वैद्यकीय मदत उशिरा मिळाल्याने विनायक मेटे यांचा अकाली दुदैवी मृत्यू झाला. तदनंतर काही दिवसातच देशातील दिग्गज उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्हीही घटना दुर्दैवी होत्या. दोन कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. दोघेही अपघात समयी मागे बसले होते असे चौकशीत निष्पन्न झाले. ह्या धर्तीवर केंद्रातून घाई घाईने एका आदेशाची घोषणा केली गेली. यापुढे वाहनाच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तिलाही आता सीट बेल्ट बंधनकारक केला गेला.

परंतु ह्या दोन्ही अपघाताच्या निमित्ताने रस्ते अपघात आणि महामार्ग सुरक्षा हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या काही कमी नाहीय. रस्त्यावरच्या खड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरवर्षी रस्त्यावरच्या खड्यांचा आणि त्यामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूचा मुद्दा समोर येतो. परंतु ह्याची दखल ना केंद्र सरकार घेत ना राज्य सरकार. का कोणता आदेश रस्त्यांच्या खड्डे भरण्याबाबत निघत.? थुकपट्टी लावणाऱ्या कंत्राटदारावर का कारवाई नाही होत.?  हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. रस्ते अपघातात मृत्यू झालेली माणसे देखील त्यांच्या कुटुंबात कर्तबगार असतात. VIP असतात. मग त्यांच्या जिविताचे काहीच मोल नाही का? VIP च्या अपघातानंतर जसे तडकाफडकी निर्णय घेतले जातात. मग तसे निर्णय सामान्य लोकांच्या बाबतीत का घेतले जात नाहीत.

राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे युतीचे सरकार राज्यात अलीकडेच स्तत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर मिडियासमोर शिंदे – फडणवीस यांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले. माध्यमांसमोर कंत्राटदारांना स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दम देताना दिसले. परंतु तरीही खड्डे मात्र जसेच्या तसेच… मग ही दमबाजी फक्त शो शायनिंग होती का? असे म्हणायचे का?

विकासाच्या नावाखाली नवे नवे प्रशस्त रस्ते बनले. महामार्ग बनले. जुन्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात आली. ह्या महामार्गावरून प्रवास करत असताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ह्याच महामार्गावर टोल बसवण्यात आले. महामार्ग, रस्त्यांची देखभाल, सोयी सुविधांच्या नावाखाली टोल वसुली केली जाते. कोणतेही ताळतंत्र ह्या टोल वसुलीत नाही. टोलची रक्कम वाढवली जाते. कुणीही विरोध करत नाहीं. अपुऱ्या सोयी सुविधा, रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे अपघात. बरे अपघात समयी तत्काळ उपलब्ध होणारी कोणतीही मदत यंत्रणा नाही. तरीही मोकाट टोल वसुली सुरूच.

गाडीत बसणाऱ्या सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावायचे, बाईक वर बसणाऱ्या दोघांनी हेल्मेट घालायचे. आणि इथे जराशी जरी कुचराई झाली की, पोलिसांच्या कारवाई ला सामोरे जायचे. जरा कुठे सिग्नल जम्प झाला की साहेब समोर अवतरलेच समजा. परंतु ह्या साहेबाना कधी अवजड वाहतूक करणारी वाहने दिसत नाहीत. त्यांनी लेन कट केलेली चालते. अवैध वाहतूकीकडे दुर्लक्ष करायचे. कुठे तरी कारवाई होत असेल परंतु ती पुरेशी नाही. पर-जिल्ह्यातील प्रवाशांना सकाळी सकाळी टोल नाक्यावर हमखास थांबवले जाते. चौकशीच्या नावाखाली कागदपत्रांची तपासणी केली जाते. आणि मग पुढे तेच… जे तुम्ही समजलाच असाल.

तुम्ही काही VIP नाहीत. तुमच्या जगण्या मरण्याने कोणत्याही यंत्रणेला काडीचाही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही वाहतुकीचे सर्व नियम पाळा. वाहनांचे सर्व कागदपत्रे अप टू डेट ठेवा. बाईक स्वारानी हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाल्यांनी सिट बेल्ट लावावा. आणि हो मुख्य म्हणजे वेगावर नियंत्रण ठेवा. बाकी ह्यात कुठे काय कमी पडले तर चहापाणीची सोय पाकिटात ठेवा. काळजी घ्या. सुखकर आणि सुरक्षित प्रवास करा…

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

(kampraful@gmail.com)

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)