#CommonwealthGames : भारतीय बॅडमिंटनपटूनी पाकिस्तानला केलं चारी मुंड्या चीत; ५-० ने मिळवला विजय…

220

भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना 5-0 च्या फरकाने मात देत एक दमदार असा विजय मिळवला आहे.

पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या जोरावर भारताने ही कामगिरी केली आहे. भारताच्या सर्वच बॅडमिंटनपटूंनी पाचही सामन्यात सरळ सेट्समध्ये विजय मिळवत पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले आहे.

सर्वात आधी भारताच्या सुमीत रेड्डी आणि आश्विनी पोनप्पा या जोडीने मिश्र सामन्यात पाकिस्तानच्या मुहम्मद इरफान आणि गझला सिद्दीकी यांना 21-9 आणि 21-12 च्या फरकाने मात देत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर पुरुष एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने पाकिस्तानच्या मुराद अलीला 21-7 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये ममात देत भारताला 2-0 ची आघाडी मिळवून दिली.

ग्रुप ए मधील तिसरा सामना महिला एकेरीचा होता. ज्यात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने पाकिस्तानच्या महूर शेहजाद हीला 21-7 आणि 21-6 अशा सरळ सेट्समध्ये सहज मात देत सामना जिंकला आणि भारताला 3-0 ची विजयी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर अखेरच्या दोन सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने पाकिस्तानच्या मुराद अली आणि मुहम्मद इरफान यांना 21-12 आणि 21-9 च्या फरकाने मात देत भारताला 4-0 ची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यात महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पाकिस्तानच्या महूर शेहजाद आणि गझला सिद्दकी यांना 21-4 आणि 21-5 अशा मोठ्या फरकाने मात देत सामना जिंकला आणि भारताला पहिल्या दिवशी पाकिस्तानवर 5-0 ने विजय मिळवून दिला.