पाच राज्यांची निवडणूक आणि बहुजन पक्षांची तयारी…

280

फेब्रुवारी आणि मार्च महिण्यात होवू घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने घोषित केले. उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर व गोवा या राज्यांतील 690 जागांसाठी ही निवडणूक असेल. त्यासाठी या राज्यांतील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्षांनी तशी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत फुले आंबेडकर विचाराला मानणाऱ्या पक्षांची तयारी किती झाली? याचाही विचार होणे आवश्‍यक आहे. भाजप आणि काँग्रेससाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. पाच राज्यांतील 690 जागेचा विचार करता भाजपच्या आज एकूण 419 जागा तर काँग्रेसच्या 143 जागा आहेत. टक्केवारी काढल्यास भाजपकडे 60 टक्के तर काँग्रेसकडे 20 टक्के जागा आहेत. या एकूण पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेश निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे राज्य आहे. दिल्लीवर कब्जा करायचा असेल तर उत्तरप्रदेश राज्य आधी बळकावे लागते. म्हणूनच सर्व पक्षांची नजर उत्तरप्रदेशवर लागलेली आहे.

या राज्यात ब्राह्मणांची संख्या 16 टक्के आणि क्षत्रिय व वैश्‍य मिळून ही संख्या 22 टक्के आहे. इतर कोणत्याही जातीसमूहापेक्षा ही संख्या जास्त आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशचा ब्राह्मण राजकारणात कायम केंद्रस्थानी राहिला आहे. या समूहाला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न असतात. म्हणूनच स्वतःला फुले-आंबेडकरवादी म्हणवून घेणारे पक्ष ब्राम्हण समूहाला आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, राजकारणासाठी विचारधारेशी तडजोड करीत आहेत.

या निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘हिंदुत्व’ मुद्दा जास्त चर्चिला जात आहे. या देशातील एससी, एसटी आणि ओबीसी जगताना हिंदू म्हणून जगतो. त्यामुळे ‘हिंदुत्व’ ही ओळख निवडणुकीचे मुख्य अस्त्र बनले आहे. ते अस्त्र कधी काँग्रेस तर कधी भाजपच्या हातात असते. भारताच्या राजकारणात मूलभूत गरजांना डावलून जाणीवपूर्वक असे निरर्थक मुद्दे पुढे केले जातात. जात, धर्म केंद्रीय स्थळी ठेवून राजकारण केले जाते. काँग्रेस आणि भाजपमध्ये आपणच कसे हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करण्याची स्पर्धा लागली आहे. राहुल गांधीने आपले हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळे कसे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. राहुल गांधी हे जानवेधारी ब्राह्मण आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ब्राह्मण हा ब्राह्मण असतो तो हिंदू असत नाही की शूद्र असत नाही. त्यांनी स्वतःला सर्वोच्च स्थानी ठेवले आहे. आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवण्यासाठी ब्राह्मण हिंदुत्वाचा आधार घेतो.

90 च्या दशकात उत्तरप्रदेशात कांशीराम आणि मुलायमसिंह यांची झालेली युती हे एक बहुजनांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पाऊल होते. मात्र दोघांचीही राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे ते विभक्त झाले. या ठिकाणी परत जात फॅक्टर वरचढ ठरला. मंडल आयोगाच्या काळात जी राजकीय उंची मिळाली होती ती पुढे कायम ठेवता आली नाही. ती आजपर्यंत कायम असती तर देशाचे चित्र वेगळे असते. कांशीराम, शरद यादव, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाला तेव्हा मान्यता होती. मात्र राजकीय अभिलाषा परत एकदा वरचढ ठरली. कांशीराम आणि नंतरच्या काळात बीएसपी एक आशेचा किरण ठरू पाहत होती. सामाजिक ध्रुवीकरणाचा परिणाम म्हणून मायावती चार वेळा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या. ‘तिलक तराजू और तलवार इसको मारों जुते चार’ या नाऱ्यासह विचारधारेचा तो प्रभाव होता. कांशीरामनंतर बीएसपीच्या सुप्रीमो म्हणून मायावतीला पुढे करण्यात आले आणि इथूनच या पक्षाला घरघर सुरू झाली. जो कार्यकर्ता तीस-चाळीस वर्षांपासून केवळ विचारधारेवर काम करत होता तो दुखावला. विचारधारेशी तोडजोड त्याला पसंत नव्हती. या भाऊगर्दीपासून तो दूर गेला ते कायमचाच!

मतासाठी समाजवादी पार्टी परशुरामला जवळ करीत आहे. तसाच बहुजन पार्टीला राम प्रिय वाटू लागला आहे. बहुजन समाज पार्टी आता बहुजनांची राहिली नाही ती सर्वजनांची झाली. बहुजन समाजाची साथ न घेता ब्राम्हण, वैश्‍य आणि क्षत्रियाला सोबत घेऊनच आपण सत्तास्थानी येऊ शकतो, असा भाबडा आशावाद मायावतीत निर्माण झाला. अर्थात या मागे पक्षाचे सेक्रेटरी सतीश मिश्राचा मेंदू काम करतो, हे सुज्ञ कार्यकर्त्यांना, मतदारांना सांगण्याची आवश्‍यकता नाही. आज मायावती केवळ नावाला सुप्रीमो आहेत. या पक्षाचे रिमोट मात्र मिश्राच्या हातात आहे.

मतदार आता पर्याय शोधत आहे. तो पर्याय उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. बहुजन समाज 85 टक्के आहे त्याच्या बळावरच आपण आपली सत्ता स्थापित करू शकतो. त्यासाठी वेळ लागेल. या निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत. तेव्हा मतदारांनी विवेक बुद्धी जागृत ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला आहे त्याचा उपयोग करायचा आहे आणि खरे प्रतिनिधी सभागृहात पाठवायचे आहेत. तेव्हाच बहुजन समाजाचे कल्याण होईल.

,

लेखक – जीवन गावंडे,

नागपूर,

संपर्क : 7350442920

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ

 

बातम्या, लेख, साहित्य आमच्याकडे पाठवा, आम्ही www.YuvaPrabhav.Com या मराठी न्यूज पोर्टल वर प्रकाशित करू. Email : yuvaprabhav@gmail.com