पुरोगामी महाराष्ट्रात हे काय सुरु आहे ? हिंगोलीत मागासवर्गीय समाजावर बहिष्कार…

639

हिंगोली – फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या घटना रोज समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जातीयवादाने डोके वर काढले आहे का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा येथे गायरान जमिनीत निळा झेंडा लावल्याने मागासवर्गीय समाजावर गावातील उच्चवर्णीय लोकांनी बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दलित समाजातील लोकांना धान्य दळण दळून दिले जात नाही. तसेच दुकानांमध्ये सामान दिले जात नाही. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलीस अधिक्षकाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथे असलेल्या गायरान जमिनीवर गावातील उच्च वर्णीय एका समूहाने ताबा करीत तेथे स्मशानभूमी व मंगल कार्यालय उभारले आहे. त्या पाठोपाठ येथील मागासवर्गीय समाजाने उर्वरित गारायन जमिनीवर बौद्ध मंदिर बांधण्याच्या उद्देशाने निळा झेंडा रोवला. याचाच राग मनात धरून येथील उच्च वर्णीय लोकांनी मागासवर्गीय समाजावर बहिष्कार टाकला आहे.

सावरखेडा येथील गिरणीवरील दळण मागासवर्गीय समाजासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच गावात असलेल्या हनुमान मंदिरावर विशिष्ट मंडळींनी बैठक घेऊन मागासवर्गीय समाजाला दुकानावरील सामान देणे बंद केले. एवढेच नव्हे तर वाहनाने प्रवास देखील नाकारण्यात आला. गावातील विशिष्ट समाजाने एवढ्यावर न थांबता गावात परगावावरून येणाऱ्या दुकानदारालाही मागासवर्गीय समाजाला किराणा सामान न देण्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे मागासवर्गीय लोकांनवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

या संपूर्ण प्रकाराने सावरखेडा येथील मागासवर्गीय समाज गोंधळून गेलेला आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासना कडून लक्ष देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न जात आहे.