स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पदार्पण करताना देखील असुरक्षिततेच्या जोखडात कायमच अडकलेली ‘ती’..

347

अनेक थोर वीरांच्या प्राणांतिक कष्टाने भारत देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला आणि सावित्रीमाईच्या कणखर निर्धारामुळे स्त्री अज्ञानाच्या गुलामगिरीतून बऱ्याच अंशी मुक्त झालीय.पण अन्याय,अत्याचार,बलात्काराची टांगती तलवार आजही भोवताली विळखा घालून आहेच की,जिथे स्त्री स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभा राहतोच.हल्लीच घटित घटनांनी मन सुन्न झालंय….समतेची भाष्य करतांना चव्हाट्यावर तिच्या अब्रूची लक्तरे फाडतांना हरवलेल्या मानवतेची खंत वाटते.

स्त्रीदेहाची कशी,ही क्रुर विडंबना

काय म्हणावं,भावनाशून्य नराधमांना  

वासनेचा विदारक,खेळ मांडताना  

हरवल्या कुठे,आज मानवी संवेदना  

स्त्रीत्वाचा अमानूषपणे छळ करून तिला जिवंत जाळणे…या कल्पनेनेच अंगावर काटा येतो.मग हे सर्व करणारे निर्बुद्धी जनावरं आहेत की मन आणि बुद्धी असणारे मानव…..??? हाच प्रश्न पडतो मला.खूप वाईट वाटतं.डोक्यात विचारांचं वादळ आणि मनात वेदनेनी कंप सुटतो.वासनेची धुंदी अशी चढते या तरूणांवर की सभ्यता, मानवता, भावना, संवेदना, आदर या गोष्टी त्यापुढे अगदी गौण ठरतात.आईची ममता,बहीणींची माया,पत्नीचा विश्र्वास, लेकीचा गौरव यांपैकी काहीच आठवत नसेल का त्यांना अशा अमानुष कृती करतांना? पण तरीही काही जण स्त्रीलाच बोट दाखवतात.’सातच्या आत घरात’ हा नियम का पाळत नाहीत? योग्य कपड्यांची निवड का करत नाही?इतक्या रात्री एकटं निघायची काय गरज होती? पण या घटनांमागे खरंच ही कारणं आहेत का?

कधी व्यावसायिक गरज,कधी आकस्मिक प्रसंग, कौटुंबिक आवश्यकता,कधी प्रवास,कधी नाईलाज अशा अनेकानेक कारणांमुळे कधीतरी रात्री अपरात्री बाहेर पडण्याची वेळ येते.पण या घटना रात्रीच घडतात असेही म्हणता येत नाही.दिवसाढवळ्याही शरीराचे लचके तोडणाऱ्या बलात्कारी घटना आहेतच.मग त्यात निरागस मुली अन् प्रौढ स्त्रियाही सुटलेल्या नाहीत.म्हणून लोकांनी ही मानसिकता सोडून यामागची मुळ कारणे शोधणे गरजेचे आहे.ज्यामध्ये तरूण तरुणांचा भावनांवर असंयम व सामंजस्याचा अभाव,नैतिक मुल्यांचा ऱ्हास,लैंगिक शिक्षणाचा अभाव,लैंगिक उद्भोदन करणाऱ्या चर्चेचा अभाव,चित्रपट व मालिकांमध्ये वाढते अंगप्रदर्शन व अश्लील दृश्यांचा वापर,इंटरनेटवर लैंगिक चित्रफितींचा अनियंत्रित प्रचार व प्रसार,कठोर व त्वरीत शिक्षेच्या अभावाने बलात्काऱ्यांचे वाढते मनोबल….या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.

या सर्वांवर उपाययोजना म्हणून शालेय जीवनात लैंगिक शिक्षण देणे,नैतिक मुल्यांची जपणूक करणे,बलात्कारी आरोपींना कठोर शासन त्वरीत करणे,शिक्षेचे एक असे उदाहरण प्रस्थापीत करणे जेणेकरून वर्षानूवर्ष असे काही करण्याचा विचारही तरूणांमध्ये येणार नाही,शासनानेही अशा घटनांचा लवकर तपास करणे,तपासणीसाठी विशेष कमीटी स्थापन करणे,पिडीत महीलांना प्रश्न विचारण्याकरीता महीला अधिकारी नियुक्त करणे,बलात्कार पिडितेच्या आरोग्यतपासणीची कमीत कमी वेळेत सोय करणे,अशा महीलांना स्वयंरोजगाराची संधी देवून पुनर्वसनाची सोय करणे,मानसिक खच्चीकरण भरून काढण्यासाठी उद्भोदक वर्ग घेणे,चित्रपटातील दृश्यांवर अंकुश लावणे….या गोष्टींची अमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे.

महिला व मुलींनी देखील स्वसंरक्षणासाठी खंबीर पाऊल उचलून स्वतःचे आत्मबल वाढवायला हवे.मुलींनी याबाबत जागरूक राहणे,निर्वाहतूक रस्त्यावर रात्री अपरात्री एकटे बाहेर पडण्यास टाळणे,कुठेही जाताना नातेवाईकांना कल्पना देणे,स्वसुरक्षिततेसाठी काही पायाभूत प्रशिक्षण घेणे,अनोळखी व्यक्तींकडून मदत घेण्य्यास हेटाळणे,असामान्य वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल,असहनीय वागणूकीबद्दल त्वरीत पोलीसांना कळवणे,पोलीसांनी उपलब्ध करून दिलेल्या अँपचा,मोबाईल क्रमांकांचा पुरेपूर उपयोग करणे,धोक्याच्या प्रसंगी कामात येतील अशा काही वस्तू जवळ बाळगणे जेणेकरून प्रतिबंधात्मक कृती करणे शक्य होईल आणि अशा घटनांंना आळा बसेल.

आत्मविश्वासाने बांध सखये

निडर प्रतिकाराचे तुच धरण

नयनांचे शर चालवून धाडसी

कर अन्यायाचे समुळ भक्षण.

 

लेखिका – मीता अशोकराव नानवटकर.

सावनेर, नागपूर.

संपर्क : 9823219083

 

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ

 

बातम्या, लेख, साहित्य आमच्याकडे पाठवा, आम्ही www.YuvaPrabhav.Com या मराठी न्यूज पोर्टल वर प्रकाशित करू. Email : yuvaprabhav@gmail.com