काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा उद्या होणार भाजप प्रवेश…

314

मुंबई : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई महानगर पालिका तोंडावर असताना कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे महानगर पालिकेचे निवडणुकीचे चित्र बऱ्याच अंशी बदलणार आहे. (ex congress leader kripashankar singh will join bjp tomorrow)

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून डावलले गेले होते. मात्र, 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 व 35A हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी सवाल उपस्थित केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर ते राजकारणापासून थोडे अलिप्त होते.

मात्र आता कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजप प्रवेश होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईत सुमारे 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. म्हणजे उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायकही आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा भाजपला त्याचा फायदाच होणार असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.