धक्कादायक बातमी ! महाराष्ट्रातील ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचा पहिला बळी…

242

रत्नागिरी : करोना दुसऱ्या लाटेतून देश सावरत असताना आता देशावर डेल्टा प्लस व्हेरियंटचे संकट घोंघावत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे या काळात अनेकांना आपले प्राण गमावले लागले. त्यातच महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचा पहिला बळी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरची रहिवासी असलेल्या एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या वृद्ध महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत महिलेला इतरही आजार होते, अस राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात २१ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यात आता एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, आत्तापर्यंत ३ हजार ४०० नमुन्यांपैकी २१ केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यात करोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील २१ रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण ०.००५ टक्के आहे. त्यामुळे करोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ झाली नाही. मात्र हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं.