#CycloneTauktae : चक्रीवादळाचा धोका, किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा…

295

मुंबई : तोक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) संभाव्य धोका असल्याने परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं हे चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. तर काही परिसरात सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील 38 गावांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या वादळाचा काळ तीन दिवसाचा आहे. त्यामुळे किनारपट्टीसह जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. एनडीआरएफची टीम जिल्ह्यात तैनात करण्यात आली नाही, मात्र आवश्यक असल्यास एनडीआरएफची टीम पुण्यात तयार असून मागवण्यात येईल.