#LockDown : नागपुरात 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार लॉकडाउन, पालकमंत्री नितीन राऊतांची माहिती…

332

नागपूर : राज्यभरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि होळी सण लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागपुरात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान या निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार विस्कळित होऊ नये याचीही योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. व्यापाऱ्यांसोबतही याविषयावर चर्चा करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

लॉकडाउन जाहीर करुनही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रुग्णसंख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज २,२०० ते ३००० जवळपास रुग्ण आढळून येत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागपूर शहरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आल्याची महिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.