राष्ट्रवादी युवक अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा; अजूनही अटक का नाही – चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल….

365

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गन्हा दाखल झालाय, असं चित्रा वाघ म्हणाल्या. या पद्धतीच्या प्रकरणांत आरोपीला अटक करण्यात येते. औरंगाबाद पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. सर्वसाधारण आरोपी असता तर त्याला अटक करण्यात आली असती, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. चौकशी आणि तपासाच्या नावाखाली आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी समोर दिसत असताना पोलीस का शांत बसले आहेत, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? हा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे. ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कँम्पेन राबवण्यात येत आहे. पीडिते आणि तिच्या कुटंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी आपला खुलासा जाहीर केला आहे. ज्या खुलाशात या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली. संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. आरोपी मी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करतोय, असं मेहबबू शेख म्हणाले. 14 नोव्हेंबरला गावाकडं होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असंही मेहूबब शेख म्हणाले.