दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हाडाची लॉटरी…

507

मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाने ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासातील 269 रहिवाशांना दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी खुशखबर दिली आहे. पुनर्विकासाच्या इमारतीमधील 269 फ्लॅटच्या (घरांसाठी) लॉटरीसाठी 29 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात येईल, असे मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाचे मुंबई मंडळ करत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम सुरू आहे. मंडळाने 269 रहिवाशांची पात्रता निश्चित करून त्यांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आले आहे. या 269 रहिवाशांना पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसनाची पूर्णतः खात्री मिळणार आहे. कारण पुनर्वसन इमारतीतील त्यांचे घर लॉटरीच्या माध्यमातून निश्चित होणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर या 269 रहिवाशांना नवीन घराचा स्वप्न साकारणे शक्य होणार आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी याला दुजोरा दिला आहे. पण, त्याचवेळी हा अंदाजित मुहूर्त असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.