दिपक चंदनशिवे यांच्या प्रयत्नामुळे, सामाजिक न्याय विभागाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा’ विस्तार; हजारो मागासवर्गीय विद्यार्थाना होणार लाभ….

1206

मुंबई / सोलापूर : समाज कल्याण विभागाच्या वतीने ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा गरीब कुटुंबातील जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेतून प्रवेश दिला जातो. मात्र तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. हि अन्यायकारक बाब लक्षात घेऊन रिपाई (आ) चे प्रदेश संगठन सचिव दिपक चंदनशिवे यांनी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे शहरापासून ५ किमी हद्दीपर्यंत महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या, हि मर्यादा आता १० किमी पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मंत्रालयात बुधवारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा विस्तार केल्याने तालुका स्तरावरील हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

दिपक चंदनशिवे यांनी स्वाधार योजनेतील ह्या मागणीसाठी, तालुकास्तरावर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. स्वाधार योजनेचा लाभ तालुका व ग्रामीण पातळीवरील विद्यार्थ्यांना देखील मिळावा यासाठी अधिपत्रक काढून समाज कल्याण विभागाला सूचना देण्यात यावी अशी मागणी दिपक चंदनशिवे यांनी केली होती.

स्वाधार योजनेचा लाभ तालुका स्तरावर मिळावा यासाठी दिपक चंदनशिवे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे मोठी शहरे, महानगरपालिका तसेच जिल्हा स्तरावरून आता तालुका स्तरावर विविध महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.

दिपक चंदनशिवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यातील तमाम विद्यार्थ्यांना आता स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे दिपक चंदनशिवे यांच्या वर समाजातील सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.