#CoronaCrisis : मुलुंडकरांनो सावधान ; धोका वाढतोय……

407

मुंबई || मुंबईत करोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना देखील आतापर्यंत रुग्णसंख्या कंट्रोल मध्ये असलेल्या मुलुंड चा धोका वाढत चालला आहे. येथे रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत असल्याने चिंता वाढली आहे.

ईशान्य मुंबईतील मुलुंड, घाटकोपर, भांडुप परिसरात रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीकडे भायखळा, अंधेरी पश्चिम, ग्रॅन्ट रोड, एल्फिन्स्टन परिसरात रुग्णदुपटीचा कालावधी हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

१८ मेपर्यंत दहिसरमध्ये सर्वात कमी म्हणजे १६०, सॅण्डहस्र्ट रोडमध्ये २८१, मुलुंडमध्ये ३०८, गोरेगावमध्ये ४०६, भांडुपमध्ये ५५५, घाटकोपरमध्ये ५७२ रुग्ण सापडले होते. कमी रुग्णसंख्या असली तरी या भागातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे मुंबई महानगर पालिका अधिकारी चिंतित झाले आहेत.

मुलुंड आणि घाटकोपरमधील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांवर आला आहे. तर भांडुपमध्ये हा कालावधी आठ दिवसांचा आहे. अन्य विभागांच्या तुलनेत या परिसरामध्ये रुग्ण संख्या कमी असली तरी तेथील रुग्णदुपटीचा कालावधी सर्वांच्या चिंतेचे कारण बनला आहे.