…मीच सांगितला शिवाजी कोण होता?….

653

महाराष्ट्राची शान, स्वराज्याचा मान,
दिन दलितांचा कैवारू, रयतेचा छत्रपती होता,
जीर्ण रूढी परंपरांना, छेदणारा वीर होता.
पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ रोवणारा, क्रांतिकारक होता.
होय, मी पानसरे, मीच सांगितला शिवाजी कोण होता? ||

ज्याच्या स्वराज्यात शेतकरी सुखी नी धनसंपन्न होता,
सुबक प्रशासन, योग्य नियोजन, काटेकोरपणा होता,
शेतकऱ्यांच्या गवताच्या पातीला हात लावायचा नाय
असे फर्मान सोडणारा, कर्तव्यदक्ष माझा राजा होता,
होय, मी पानसरे, मीच सांगितला शिवाजी कोण होता? ||

महिलांना समाजात मान होता, असा माझ्या राजाचा दरारा होता
वाकडी नजर टाकायची, कोणाचाही घास नव्हता.
स्वराज्यात, जिजाऊ मातेचा आदर्श, आयाबहिणीचा सन्मान होता.
प्रगतीपथावर अग्रेसर, रक्षणकर्ता माझा राजा होता,
होय, मी पानसरे, मीच सांगितला शिवाजी कोण होता? ||

सतीप्रथा, बालविवाह, जीर्ण रुढींचा कर्दनकाळ होता,
गडकिल्ल्यांचे साम्राज्य, जलदुर्ग, सागरी सुरक्षेचा निर्माता,
परकीय शत्रुना दे माय धरणी ठाय करायला लावणारा होता,
कर्तबगारीचा, पराक्रमाचा महामेरू, असा रयतेचा खरा छत्रपती होता,
होय, मी पानसरे, मीच सांगितला शिवाजी कोण होता? ||

अरे, शिवाजी कोण होता, तू जे सांगतो तो नव्हता,
सांग, खुशाल सांग, पण आम्ही सांगतो तसाच होता,
धमकी आल्या, हल्ला झाला, घेतला वसा सोडला नव्हता,
आपला राजा रयतेचा राजा, खरा तोच सांगितला होता,
होय, मी पानसरे, मीच सांगितला शिवाजी कोण होता? ||

– प्रफुल गोरख कांबळे  Editor-In-Chief : YuvaPrabhav.com