#भीमा-कोरेगाव : तपास केंद्राकडे सोपवलेला नाहीच, सीएम उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

535

सिंधूदुर्ग : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद ही दोन्ही वेग-वेगळी प्रकरणे आहेत. त्यातील भीमा-कोरेगाव हा दलित बांधवांशी संबंधित विषय आहे. या प्रकरणाचा तपास केंद्राकडे सोपवलेला नाही आणि यापुढे सुद्धा ते देणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

“नीट लक्षात घ्या की एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेग-वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे, तो भीमा कोरेगावबाबत आहे आणि भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तसेच तो केंद्राकडे देणारही नाही. भीमा कोरेगावमध्ये दलित बांधवांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे, त्याच्यात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी दलितांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे. केंद्र सरकारने जो तपास आपल्याकडून काढून घेतला आहे तो एल्गारचा आहे, भीमा कोरेगावचा नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका. मी पुन्हा सांगतो, एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे,” असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहे.