मुंबईची झाली तुंबई; मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत. जनजीवन ठप्प…

776

मुंबई : मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसंच पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.बंगलाच्या उपसागरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपटटी, मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे. मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून अतिदक्षता म्हणून कुर्ला परेलमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात, पुण्याहून आणखी दोन टीम पनवेल आणि रायगडकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्लो-फास्ट दोन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. दादर ते कुर्ला, वडाळा ते कुर्ला सर्व ट्रॅकवर साचलं पाणी, हिंदमाता परिसरात पाणी साचल्यानं पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हार्बर रेल्वे- कुर्ला ते चुनाभट्टीदरम्यान लोकलसेवा देखील बंद झाली आहे.

ठाणे-सीएसएटी रेल्वेसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद, ठाणे ते कल्याण आणि कल्याण ते ठाणे धीमी वाहतूक सुरू पण या गाड्याही अर्धा ते एक तास उशिराने असतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून दिली आहे. नालासोपारा ते विरार आणि विरार ते वसई रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकल सेवा बंद झाली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गवर पाणी साचल्यानं बीकेसी, विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, पवईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार, पालघरमध्ये पावसाचा जोर कायम आहे.