नांदेड : वंचित बहुजन आघाडी निर्णायक ठरणार…

631

नांदेड : आजवर नांदेड लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे़ आतापर्यंत झालेल्या १५ लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल १२ निवडणुकांत येथे काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे़. १९७७ मध्ये शेकापचे भाई केशव धोंडगे विजयी झाले होते़ त्यानंतर १९८९ मध्ये डॉ़. व्यंकटेश काब्दे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात जनता दलाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती आणि २००४ मध्ये भाजपाच्या वतीने डी़. बी़. पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता़

नांदेड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम व दलित मते निर्णायक आहेत. तर दीड लाखाच्या आसपास धनगर-हटकर समाजाची मते आहेत़ त्यामुळेच १९८७ मध्ये खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड लोकसभेची निवडणूक लढविली होती़. त्यावेळी काँग्रेसच्या वतीने लढत असलेल्या अशोक चव्हाण यांना २ लाख ८३ हजार १९ तर प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७१ हजार ९०१ अशी मते मिळाली होती़.

प्रा़. डॉ़. यशपाल भिंगे हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथे निवडणूक लढवत आहेत. वंचित आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या सभेला देखील तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे वंचित आघाडी हीच निर्णायक ठरणार आहे. असे एकूण चित्र दिसत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. एक भाजपकडे तर दोन मतदारसंघात शिवसेना प्रतिनिधित्व करीत आहे़ मात्र मागील विधानसभा निवडणुकीत नांदेड शहरातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जागांवर एमआयएमने चुरशीची लढत दिली होती़ त्यामुळेच वंचित आघाडीने यावेळी नांदेडवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते़ काँग्रेस आणि भाजपाच्या तुलनेत आघाडीकडे सक्षम प्रचारयंत्रणा नाही़ त्यामुळेच वंचित आघाडी या निवडणुकीत कुठपर्यंत मजल मारते यावरच मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल़.