आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ… : प्रकाश आंबेडकर

693

नांदेड : “आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ…” असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं प्रचार सभेत आंबडेकर बोलत होते. नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलंय, अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातच सरकार आता व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. सरकार व्यापाऱ्यांना धमकाऊन भीती घालून भाजपचा प्रचार करायला भाग पाडतंय, असा आरोप आंबडेकर यांनी केला. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे, आमचं सरकार जर आलं तर या जुन्या नोटा पुन्हा बदलून देण्यात येतील,  असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिलं.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आंबडेकर यांची नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं सभा झाली. वंचित बहुजन आघाडीच्या या सभेला भर उन्हात लोकांनी मोठी गर्दी केली होती. हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवारासाठी ही सभा होती. या सभेला हदगाव हिमायत नगर तालुक्यातून अनेक लोक उपस्थित होते. याच सभेत अनेक लोकांनी निवडणुकीसाठी म्हणून आंबडेकर यांना आर्थिक मदतही दिली.