काही ठराविक कुटुंबा भोवती फिरणारी सत्ता वंचित समाजापर्यंत पोहचवणार : प्रकाश आंबेडकर.

812

बीड : काही ठराविक कुटुंबा भोवती फिरणारी सत्ता वंचित समाजापर्यंत पोहचवण्यासाठी आघाडी केली आहे. असा विश्वास व्यक्त करताना, सत्ता आल्यास आर एस एस ने नोंदणी केली नाही तर, त्यांच्या वर बंदी घालून जेल मध्ये सडवू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते बीड मधील सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते.

” भारतात सघटना कंपनी, संस्थेला नोंदणी आवश्यक आहे. मग, आरएसएसला का नाही. वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर आरएसएसने नोंदणी केली नाही तर त्यांच्यावर बंदी घालू, व त्यांना जेलमध्ये सडवू,” असा इशारा  प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

भाजप – आरएसएसला चळवळीचा नसून हिंदू – मुस्लिम दंगलीचा इतिहास असल्याचा आरोप त्यांनी केला.देशात विकास, हाताला काम देण अपेक्षित असताना दहा टक्के आरक्षण देवून हे सरकार जनतेला फसवत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे, पण कोणतेही नियोजन नाही. महाराष्ट्रातील १६९ कुटूंबाभोवती फिरणारी सत्ता वंचित समाजा पर्यंत पोचविण्यासाठी आघाडी केली आहे, असेही ते म्हणाले .

लोकसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. वंचित आघाडी मार्फत लोकसभेपूर्वी – विधानसभा उमेदवार जाहीर करण्याचा मनसुबा होता. मात्र, आता उमेदवारी जाहीर झाली तर जीवाला धोका निर्माण होईल अशी भिती असल्याचे अनेकांनी सांगीतल्याचा गंभीर आरोप  प्रकाश आंबेडकर यांनी केला.

बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण माने आणि एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते…