Navi Mumbai : दहावीच्या विद्यार्थ्याचं मित्रांकडून अपहरण; मागितली 50 हजारांची खंडणी

46

Navi Mumbai : दहावीच्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खंडणी वसूल करण्यासाठी मित्रांकडूनच अपहरण करून त्याला छळल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडीत मुलगा हा नवी मुंबई मधील वाशीचा (Vashi) रहिवासी आहे. त्याचं 7 मित्रांकडून अपहरण करण्यात आलं नंतर पैसे उकळण्यासाठी त्याला त्रासही देण्यात आला. पीडीत मुलगा सध्या दहावीच्या परीक्षेचा विद्यार्थी आहे.

Times of India, च्या रिपोर्टनुसार मित्रांच्या ग्रुपने 16 वर्षीय तरूणाचे अपहरण केले आणि त्याला वाशी गावाजवळील एका जेट्टी वर नेले. पोलिसांच्या माहितीनुसार या पीडीत मुलाला मित्रांनी त्रास दिला सोबतच जळत्या सिगारेटचे चटके दिले. सुटका करण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली. 1 मार्चला या पीडीत मुलाने आपण दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांसोबत अभ्यास करायला जातोय असं त्याने पालकांना सांगितलं.

वाशी पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिल्डिंग जवळ उभं राहून मित्राशी बोलत असताना एक गाडी आली आणि त्याला अपहरण करून घेऊन गेली. पिडीत मुलाचे 7 मित्र देखील गाडीत होते. नंतर, त्याने घरी पोहोचल्यावर खंडणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी त्याला त्याच्या घराजवळ सोडले. मात्र, लगेच पैसे न दिल्याने त्याच्या मित्रांनी त्याला 70 हजार रुपये खंडणी देण्यास सांगितले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या पालकांनाही बोलावून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. मात्र, आरोपी 19 ते 21 वर्षे वयोगटातील असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नसून त्यांना नोटीस बजावली आहे.