प्रत्येक जातीला संख्येनुसार आरक्षण तसे जातीय जनगणना लवकर करा – रामदास आठवले 

16

देशात सर्वत्र जातीय आरक्षणावरून प्रचंड मोठा वाद सुरू आहे. त्यामुळे जातीय जनगणना लवकर करून प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आरपीआयचे बाळासाहेब भनसोडे, संजय कदम व इतर नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, ‘सर्व जातीची जनगणना व्हायला हवी. त्यामुळे कुठल्या जातीची लोकसंख्या किती आहे, हे कळेल. महाराष्ट्रात जे मराठा आरक्षण सुरू आहे, त्यालाही आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. अजूनही काही मराठा समाजाचे लोक हे गरिबीत आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्नही कमी असते. अशा लोकांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे..’

मालदीववर बहिष्कार घालण्याचे आवाहन. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या मालदीवच्या तीन मंत्र्यांचा आम्ही निषेध करतो. देशाच्या लोकांनी आता मालदीवला न जाता लक्षद्वीप बेटावर जावे, असेही रामदास आठवले म्हणाले.

भटक्या जमातीची नोंदणी करा. 

राज्यात जवळपास ४० हजार भटक्या जमातीच्या नागरिकांची नोंदणी आरपीआयच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे. या नावाची नोंदणी त्यांनी मंत्री रामदास आठवले यांना दिली. या भटक्या जमातीच्या लोकांकडे त्यांचे जन्म दाखले नसतात. त्यांना जन्म दाखला, इतर केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या योजना, सुविधा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

एनडीए ला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील. 

यंदा मोदींच्या नेतृत्वाखाली NDA ला ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार आहे. महाराष्ट्रात ४० पेक्षा जास्त जागा मिळतील. त्यामुळे काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी कितीही केले तरी त्यांना खूपच कमी जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास करत आहे. अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कधी झाला नाही, तेवढा बदल मोदी सरकारच्या कार्यकाळात झाला; असेही मंत्री आठवले यांनी सांगितले.