Aatmnirbhar Bharat : खादीने आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी दिशा – मनोज कुमार

121

पंढरपूर : नव्या भारताची नवीन खादीने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला नवी दिशा दिली असून, गेल्या नऊ वर्षांत खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीने वाढ झाल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले असल्याचे केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले. भारत सरकारच्या खादी व ग्रामोद्योग आयोग आणि ना. रामदास आठवले युवा मंच या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या १८० लाभार्थ्यांना मधुमक्षिकापालन पेटी, स्वयंचलित अगरबत्ती बनविण्याची मशिन तसेच विद्युतचलित चाकाचे वाटप अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले,

या वेळी खादी-ग्रामोद्योग आयोगाचे केंद्रीय संचालक विजय श्रीधरण, राज्य निदेशक योगेश भांबरे, सहायक निदेशक सुनील वीर, अरुण यादव, उमाकांत डोईफोडे, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत, आठवले युवामंच संस्थेचे अध्यक्ष दीपक चंदनशिवे उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणाले, की आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी लघू आणि सूक्ष्म उद्योगांची मोठ्या प्रमाणावर स्थापन करण्याला तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांद्वारे स्वयंरोजगार निर्माण करून स्वावलंबी भारत निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे

.’वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मंत्रामुळे खादीला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळाली आहे. गेल्या नऊ वर्षांत खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उलाढालीने एक कोटी ३४ लाख रुपयांचा आकडा ओलांडला आहे,

तर या काळात ९ लाख ५० हजारांहून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असेही ते म्हणाले.

ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ हजारांहून अधिक कुंभार समाजातील बंधू-भगिनींना विद्युतचलित चाकाचे वाटप केले आहे, तसेच या योजनेंतर्गत ६००० हून अधिक टूलकिट्स आणि यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले आहे,

मध अभियान योजनेअंतर्गत २० हजार लाभार्थ्यांना २ लाखांहून अधिक मधमाश्‍यांच्या पेट्या आणि मधमाश्यांच्या वसाहतींचे वाटप करण्यात आले आहे. देशभरात ३ हजारांहून अधिक खादी संस्था कार्यरत आहेत, ज्याद्वारे ५ लाखांहून अधिक खादी कारागीर आणि कामगारांना रोजगार मिळत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.