रामदास आठवलेंची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना साद..

142

यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यात नवा ‘फॉर्म्युला’ तयार करण्याचे सूतोवाच केले आहे.

रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. आंबेडकर आपल्यासोबत आल्यास देशाच्या राजकारणात दोघांची एकत्रित ताकद निर्माण होईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

समता परिषदेनिमित्त रामदास आठवले नुकतेच यवतमाळ येथे आले होते. यावेळी त्यांनी आंबेडकर यांनी आपल्यासोबत यावे, या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. यापूर्वीही आठवले यांनी असे आवाहन केले आहे. रिपाइं आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांची ताकद सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही माहिती असल्याने हे दोन्ही नेते नेहमीच चर्चेत असतात. रामदास आठवले हे कायम सत्तेच्या बाजूने उभे असतात. त्याचा लाभही त्यांना वेळोवेळी मिळतो. तर, वंचितचे नेते आंबेडकर हे तळ्यात-मळ्यात, अशा अवस्थेत राहत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, केंद्रात व राज्यात भाजपच्या जागा वाढण्यात रिपाइंचा मोठा वाटा असला तरी महायुती सरकारमध्ये या पक्षाचे नाव घेतले जात नाही. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटालाच प्राधान्य देण्यात आले, अशी खंत रामदास आठवले यांची आहे. देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास केंद्र सरकारला आपला पाठिंबा राहणार नाही. सरकारमधून आपण बाहेर पडू, असा इशाराही आठवले यांनी दिला आहे. आठवले यांची ही सर्व वक्तव्ये आणि प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचा आग्रह, या भूमिकेमागे नवीन राजकीय पर्याय निर्माण करण्याची आठवले यांची खेळी तर नाही ना, याबाबतही तर्क लावले जात आहे.

रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याबाबत वारंवार आवाहन करत आहेत. तरी याबाबत आंबेडकर यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. ‘इंडिया’ आघाडीचा जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरल्यानंतर कदाचित याबाबत आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी चर्चा आहे.