गोव्यात अनुसूचित जातींना ५ टक्के आरक्षण द्यावें – रामदास आठवले

158

पणजी : गोवा भेटीवर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गोव्यात अनुसूचित जातींना ५ टक्के आरक्षण व आरपीआयला महामंडळ द्यावे, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आठवले यांनी ही मागणी केली आहे.

राज्य विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, ‘राज्यात एसटींची संख्या अगदीच कमी आहे. याआधीही जनगणनेतून ते स्पष्ट झालेले आहे.’

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, ‘गोव्यात रिपब्लिकन पार्टी सरकारच्या पाठीशी आहे. आम्हाला एखादे महामंडळ दिले जावे तसेच गोव्यात अनुसूचित जातींच्या लोकांची संख्या २ टक्के असली तरी किमान ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. व मुख्यमंत्र्यांनी त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करु, अशी ग्वाही दिलेली आहे.’

आठवले म्हणाले की, ‘एससींसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. पत्रकार परिषदेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, विजय कदम, सतीश बोरगांवकर आदी उपस्थित होते.